राजस्थानमधील सरकारी नोकरशाहीत काम करणाऱ्यांकडून खासदार आणि आमदारांना मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात मुख्य सचिव राजीव स्वरुप यांनी नाराजी व्यक्त करत निर्देश जारी केले आहेत. एखादा खासदार किंवा आमदार सरकारी अधिकाऱ्याला भेटायला आल्यास त्यांच्या सन्मानार्थ ते आल्यावर आणि ते निघताना अधिकाऱ्यांनी उठून उभं राहणं गरजेचे आहे. स्वरुप यांनी दिलेल्या या निर्देश आणि सुचनांने तातडीने पालन करण्यासंदर्भातील सांगण्यात आलं आहे.

मुख्य सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिव आणि वेगवेगळ्या विभागांच्या सचिवांसाठी या संदर्भात एक सूचना पत्रकच जारी केलं आहे. नुकतंचं खासदार आणि आमदारांनी सरकारी अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या वागणुकीसंदर्भात तक्रार करणारं एक पत्र मुख्य सचिवांना लिहिलं होतं. या पत्रामध्ये लोकनियुक्त नेत्यांनी नोकरशाहीमधील अधिकाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त केली होती. याच पत्रानंतर मुख्य सचिवांनी हे परिपत्रक जारी केलं आहे. यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ हिंदीने दिलं आहे.

राज्यामध्ये पारदर्शी आणि उत्तरदायित्व असणारे आणि संवेदनशील प्रशासन व्यवस्था निर्माण करणे हे ही सरकारीच पहिली प्राथमिकता आहे असं मुख्य सचिवांनी जारी केलेल्या या पत्रकामध्ये म्हटलं आहे. खासदार आणि आमदार आपल्या क्षेत्रातील जनतेचे प्रतिनिधि म्हणून काम करतात. विकास आणि लोकांच्या समस्येसंदर्भात या लोकनियुक्त प्रतिनिधिंचे काम महत्वाचे असते. त्यामुळेच त्याना देण्यात येणारी वागणूक ही खूप विनम्र असणे गरजेचे आहे, असं सचिवांनी म्हटलं आहे.

याच पत्रकामध्ये पुढे एखाद्या जिल्ह्यामध्ये होत असणाऱ्या विकास कामांबद्दल आणि ती कुठपर्यंत पुर्ण झाली आहेत, ती योजना काय आहे यासंदर्भात तेथील आमदार आणि खासदारांना वेळोवेळी माहिती पुरवण्यात आली पाहिजे. आपत्कालीन मदतीबरोबरच सरकारच्या इतर कामांबद्दल त्यांना नियमितपणे माहिती देण्यात यावी. यासंदर्भात लोकनियुक्त नेत्यांनी काही माहिती मागणारे पत्र दिले तर त्याला तातडीने उत्तर द्यावे. वेळोवेळी त्यांना हव्या असणाऱ्या प्रकल्पांसंदर्भातील माहिती पुरवली जावी, असंही मुख्य सचिवांनी म्हटलं आहे.