काँग्रेससमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला असल्याचे पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून मिळणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रितपणे प्रयत्न करायला हवेत,’ असेही रमेश यांनी पुढ बोलताना म्हटले. ‘काँग्रेस पक्ष सध्या गंभीर संकटाचा सामना करतो आहे,’ असेही त्यांनी म्हटले.

‘काँग्रेसने १९९६ ते २००४ या कालावधीत निवडणुकीमुळे निर्माण होणाऱ्या संकटांचा सामना केला होता. त्यावेळी पक्ष सत्तेबाहेर होता. अशाच परिस्थितीचा सामना करण्याची वेळ पक्षावर १९७७ मध्येदेखील आली होती. त्यावेळी आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र आता पक्षासमोर अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असे माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी म्हटले.

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लोकांमध्ये नाराजी निर्माण होईल, याची वाट काँग्रेस पक्ष पाहात राहिला. मात्र काँग्रेस पक्षाचा हा विचार चुकीचा ठरला. सत्ताविरोधी लाट येईल आणि त्याचा फटका भाजपशासित राज्यांमध्ये सत्ताधारी पक्षाला बसेल, असा काँग्रेसचा अंदाज होता. मात्र पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा वेगळ्या दृष्टीकोनातून विचार करतात, वेगळ्या पद्धतीने निर्णय घेतात. मोदी आणि शहांच्या कार्यशैलीचा अभ्यास करुन आम्ही योग्य लवचिकता दाखवायला होईल. अन्यथा आम्ही काळाच्या खूप मागे पडू,’ असेदेखील जयराम रमेश यांनी म्हटले.

राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने गुजरातमधील आमदारांना कर्नाटकला हलवते होते, याबद्दलदेखील जयराम रमेश यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना, भाजपनेदेखील भूतकाळात अशा प्रकारे मतांची फाटाफूट टाळण्यासाठी आमदारांना इतरत्र हलवले होते, असे रमेश यांनी म्हटले. काँग्रेसकडून गुजरातमधून राज्यसभा निवडणुकीसाठी अहमद पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात काँग्रेसला गळती लागल्याने पक्षाने ४४ आमदारांना कर्नाटकमधील एका रिसॉर्टमध्ये पाठवले होते.