काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी काँग्रेसलाच घरचा आहेर दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सतत खलनायकाच्या भूमिकेत ठेऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर टिका करत त्यांच्या चांगल्या काम न स्वीकारल्याचा काहीच उपयोग होणार नाही असं मत रमेश यांनी व्यक्त केले आहे. मोदींनी २०१४ ते २०१९ मध्ये जे काम केले त्याचे महत्व समजून घ्यायला हवे. याच कामाच्या जोरावर ते पुन्हा सत्तेत आले आहेत. त्यांचे हेच काम पाहून ३० टक्क्यांहून अधिक मतदरांनी त्यांना पुन्हा सत्तेत बसवलं असल्याचे रामेश यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपाला ३७.४ टक्के मते मिळाली असून भाजपा आणि मित्रपक्षाला एकूण ४५ टक्के मते मिळाली आहेत यावरुन रमेश यांनी काँग्रेसलाच ऐकवले आहे.

राजकीय विश्लेषक असणाऱ्या कपील सतीश कोमीरेड्डी यांच्या ‘मालेवॉलेंट रिपब्लिक: अ शॉर्ट हिस्ट्री ऑफ द न्यू इंडिया’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळा गुरुवारी दिल्लीमध्ये पार पडला. याच प्रकाशन सोहळ्यामध्ये रमेश बोलत होते. “मोदी लोकांशी अशा पद्धतीने संवाद साधतात की जास्तीत जास्त लोक त्यांच्याशी थेट जोडले जातात. मोदींच्या कामांचे जनतेकडून कौतुक होत आहे. अनेक कामे मोदींनीच पहिल्यांदा करुन दाखवली आहेत हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण (काँग्रेस) त्यांचा समाना करु शकत नाही,” असे मत रमेश यांनी व्यक्त केले.

मोदींना कायम खलनायक म्हणून दाखवल्याने फायदा होणार नाही असा इशाराही रमेश यांनी स्वत:च्या पक्षाला दिला आहे. ‘जर तुम्ही कायमच मोदींना खलनायक असल्याचं म्हणत असाल तर तुम्ही त्यांचा समाना करु शकत नाही हे लक्षात घ्यायला हवं,’ असं मत रमेश यांनी व्यक्त केलं आहे. मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये ग्रामविकास मंत्रालयाबरोबरच पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाचा कारभार पाहणाऱ्या रमेश यांनी मोदींची स्तुती करण्यासाठी आपण हे मत व्यक्त करत नसल्याचे स्पष्ट केले. राजकारणातील लोकांनी कमीत कमी मोदींनी प्रशासन आणि अर्थिक स्तरावर केलेल्या बदलांचा स्वीकार करायला हवा अशी इच्छा व्यक्त केली.

‘आर्थिक परिस्थितीबद्दल बोलायचे झाल्यास मोदी सरकारचे काम पूर्णपणे नकारात्मक नाहीय. प्रशासन आणि राजकारण या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. ज्याप्रकारे सरकारने सामाजिक बांधिलकीसंदर्भातील योजना सुरु केल्या आहेत त्या राजकारणापासून पूर्णपणे वेगळ्या आहेत,’ असं रमेश यांनी म्हटले. आपला मुद्दा पटवून देण्यासाठी त्यांनी मोदी सरकारने सुरु केलेल्या प्रधानमंत्री उज्वला योजनेचे (पीएमयूजे) उदाहरण देत या योजनेचा पंतप्रधानांना फायदा झाल्याचे रमेश यांनी सांगितले.

“सन २०१९ मध्ये राजकीय टीका करताना आम्ही मोदींच्या एक दोन योजनांची मस्करी केली. मात्र सर्वच निवडणूक प्रचारामध्ये त्यांच्या उज्वला योजनेमुळेच ते थेट करोडो महिलांशी जोडले गेल्याचे दिसून आले. यामुळे २०१४ साली त्यांच्याकडे असणाऱ्या राजकीय पाठिंब्यापेक्षा अधिक पाठिंबा मिळाला. आम्ही आमच्या निवडणूक प्रचारामध्ये शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. लोकांना तो पटलाही. त्यांनाही शेतकऱ्यांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली मात्र त्यासाठी त्यांनी मोदींना दोषी ठरले नाही. त्याचा परिणाम निकालांमध्ये दिसून आला. त्यामुळेच मोदी सामान्यांना इतके आपलेसे का वाटतात याचा आपण विचार करायला हवा,” असं मत रमेश यांनी व्यक्त केले.