रावळपिंडी येथील रुग्णालयात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरसंबंधी उलट-सुलट बातम्या प्रसिद्ध होत आहेत. पण पाकिस्तानी लष्कराने याबद्दल काहीही भाष्य केलेले नाही. त्यांनी मौन बाळगणेच पसंत केले आहे. त्यामुळे या स्फोटात मसूद अझरच नेमकं काय झालं ? हे एक रहस्यच बनून राहण्याची शक्यता आहे. यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा सुद्धा फायदा आहे.

रावळपिंडीच्या ज्या रुग्णालयात स्फोट झाला तिथे मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेल्या मसूद अझरवर उपचार सुरु होते. स्फोटात जखमी झालेल्यांमध्ये मसूद अझर असल्याची चर्चा आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांनी या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही. पण सोशल मीडिया आणि टेलिग्राम चॅनलने सूत्रांच्या हवाल्याने स्फोटात जखमी झालेल्या १० जणांमध्ये मसूद अझर असल्याचे म्हटले आहे.

या स्फोटाचे वार्तांकन करण्यापासून प्रसारमाध्यमांना रोखण्यात आले. त्यामुळे संशयात आणखी भर पडली. मूत्रपिंडाच्या विकाराने त्रस्त असलेला मसूद डायलासिस करण्यासाठी नियमित या रुग्णालयात येतो. रविवारी रात्री पाकिस्तानातून अनेकांनी सोशल मीडियावर या स्फोटाचा व्हिडिओ अपलोड केला. काही टि्वटर युझर्सनी मसूद अझर थोडक्यात बचावला असे म्हटले आहे.

पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला मसूद भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानी लष्कराने मसूदला सुरक्षित ठिकाणी हलवले होते. आता पाकिस्तानवर दहशतवाद्यांवर कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दबाव आहे. अशा परिस्थितीत मसूद, हाफिझ सईदसारख्या दहशतवाद्यांचा मुक्त संचार पाकिस्तानसाठी आणखी अडचणीचा ठरणार आहे. रावळपिंडी स्फोटामागे आयएसआयचे मसूदला गायब करण्याचे षडयंत्र असू शकते किंवा त्याला काही झाले असेल तरी ते जाहीर न करता भारती तपास यंत्रणांना चकवा देण्याची रणनिती असू शकते.