जैश-ए-मोहम्मदचे सात दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत; दहशतवाद प्रतिबंधक विभागाचा इशारा

चंदिगड : पंजाबमध्ये पाकिस्तानस्थित जैश-ए-मोहम्मदचे सहा-सात दहशतवादी घुसले असल्याची खबर गुरुवारी पंजाब पोलिसांच्या दहशतवाद प्रतिबंधक विभागाने दिल्यानंतर संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या महानिरीक्षकांनी जारी केलेल्या एका पत्रात म्हटले आहे की, हे दहशतवादी दिल्लीमध्ये घुसण्याची तयारी करीत आहेत. फिरोजपूर परिसरातील आंतरराष्ट्रीय सीमेवरून हे दहशतवादी भारतामध्ये घुसले असावेत, असेही महानिरीक्षकांनी म्हटले आहे.

किमान सहा-सात दहशतवादी सध्या पंजाबच्या फिरोजपूर परिसरामध्ये असून ते पंजाबमधून दिल्लीत घुसण्याच्या बेतात आहेत, असे या पत्रात म्हटले असून ते पत्र सर्व सुरक्षा आस्थापना आणि पोलीस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व महत्त्वाच्या ठिकाणांवर, मार्गावर तपासणी नाक्यांची संख्या वाढवावी आणि वाहनांची कसून तपासणी करण्यात यावी, अशा सूचनाही पत्रात देण्यात आल्या आहेत.

भारत-पाकिस्तान सीमेवर संरक्षणाची दुसरी फळी अधिक मजबूत करावी आणि सीमा सुरक्षा दलाशी समन्वय ठेवावा, सर्व उच्चपदस्थ अधिकारी, पोलीस महानिरीक्षक, पोलीस आयुक्त यांनी खबरदारीच्या उपाययोजना आखण्याच्या आणि त्याची अंमलबजावणी करण्याच्या नियोजनामध्ये सहभागी व्हावे, असेही पत्रामध्ये म्हटले आहे.

पंजाबमध्ये दहशतवाद्यांनी गाडी पळविली ; पठाणकोट हल्ल्याच्या पुनरावृत्तीची भीती?

चंदिगड : जैश-ए-मोहम्मदचे चार दहशतवादी पंजाबमध्ये घुसले असून त्यांनी एका गाडी पळविल्याने खळबळ माजली आहे. पाकिस्तानातून आलेल्या या चार दहशतवाद्यांनी गाडी पळविल्याची खबर मिळताच दहशतवादी हल्ला होण्याच्या भीतीने पंजाबसह दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. पठाणकोटमध्ये २०१६ मध्ये झालेल्या हल्ल्यासारखाच हल्ला दहशतवादी करतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सदर चार दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीर येथून पठाणकोट येथे जाण्यासाठी एक गाडी भाडय़ाने घेतली. मात्र माधोपूर येथे गाडी येताच या दहशतवाद्यांनी चालकाला बंदुकीचा धाक दाखविला आणि त्याला गाडीतून बाहेर फेकले. त्यानंतर हे दहशतवादी गाडी घेऊन पसार झाले. या घटनेनंतर गाडीचालकाने त्वरित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली आहे.

या घटनेनंतर पंजाबसह दिल्ली आणि जम्मू-काश्मीरमध्ये अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे पंजाब आणि जम्मू-काश्मीर पोलीस माधोपूर परिसरामध्ये या दहशतवाद्यांचा शोध घेत आहेत. अन्य सुरक्षा यंत्रणांनाही अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

सीसीटीव्हीचे फुटेज पाहूनही तपास करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले. पठाणकोट येथे हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात जण ठार झाले होते.