News Flash

मसूद अझहरचा पुतण्या व ‘जैश’चा टॉप कमांडर भारतात, सुरक्षा यंत्रणांना हायअलर्ट

भारतात घुसखोरी करताच इस्माइल दिल्लीत गेला होता. तिथून काही दिवसांनी तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला. दिल्लीत दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने संघटनेने जाळे तयार केल्याचा संशय

संग्रहित छायाचित्र

जैश- ए- मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा प्रमुख मसूद अझहरचा पुतण्या आणि मसूदच्या लहान भावाचा माजी अंगरक्षक व सध्याचा जैशचा टॉप कमांडर हे दोघे भारतात आल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. दोघेही भारतात आल्याने गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या असून दिल्ली आणि श्रीनगरमध्ये संघटनेचे जाळे तयार करण्यासाठी ते आले असावेत, असा अंदाज गुप्तचर यंत्रणेने वर्तवला आहे.

मसूद अझहरचा मोठा भाऊ इब्राहिमचा मुलगा मोहम्मद उमर याने मेच्या शेवटच्या आठवड्यात काश्मीरमार्गे भारतात घुसखोरी केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. याच महिन्यात मसूदचा लहान भाऊ अब्दुल रौफचा अंगरक्षक व जैशचा कमांडर मोहम्मद इस्माइल याने देखील भारतात घुसखोरी केल्याची माहिती आहे. ‘आयसी ८१४’ या विमानाच्या अपहरणात रौफ हा मुख्य आरोपी आहे.

सुरक्षा यंत्रणाच्या दृष्टीने चिंतेची बाब म्हणजे, भारतात घुसखोरी करताच इस्माइल दिल्लीत गेला होता. तिथून काही दिवसांनी तो पुन्हा काश्मीरमध्ये परतला. दिल्लीत दहशतवादी हल्ल्यांसाठी त्याने संघटनेने जाळे तयार केले असावे, असा अंदाज आहे. इस्माइल हा पुलवामा ते श्रीनगर दरम्यान कुठे तरी लपून बसला बसल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मसूद अझहरचा पुतण्या मोहम्मद उमर हा जम्मू- काश्मीरमधील तरुणांना दहशतवादी संघटनेत सामील करुन घेण्यासाठी काम करत आहे. नव्याने भरती झालेल्या तरुणांना प्रशिक्षण देण्याचे कामही त्याच्याकडे सोपवण्यात आल्याचे गुप्तचर यंत्रणांना समजले आहे. अमरनाथ यात्रा आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर जैश- ए- मोहम्मदच्या दोन टॉप कमांडर्सनी भारतात असणे हा धोक्याचा इशारा असल्याचे सुरक्षा तज्ज्ञांनी सांगितले. यापार्श्वभूमीवर दिल्ली पोलीस आणि अन्य सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 5:19 am

Web Title: jaish e mohammed chief masood azhar nephew former bodyguard in india agencies on high alert
Next Stories
1 दिल्लीत कारची तोडफोड करणारा ‘कावडिया’ सराईत चोरटा, पोलिसांनी केली अटक
2 गुजरातचे मुंद्रा बंदर अतिरेक्यांचे लक्ष्य?
3 तिहेरी तलाक विधेयकात सुधारणा
Just Now!
X