‘बिहारमधून शस्त्रांची जमवाजमव’

जैश -ए -मोहम्मद ही दहशतवादी संघटना दिल्लीत हल्ला करण्याचा कट आखत असल्याची माहिती जम्मू-काश्मीरच्या पोलीसप्रमुखांनी रविवारी दिली.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या कार्यालयाचे चित्रण करणाऱ्या दहशतवाद्याच्या अटकेपाठोपाठ आतादिल्लीत हल्ला करण्याची ‘जैश’च्या कटाची माहिती उजेडात आली आहे. काश्मीरमधील दहशतवाद्यांनी बिहारमधून शस्त्रे जमवण्यास सुरुवात केली आहे. हे दहशतवादी पंजाबमध्ये शिकणाऱ्या काही काश्मिरी विद्यार्थ्यांचा वापर खोऱ्यात शस्त्रपुरवठ्यासाठी करीत असल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस प्रमुख दिलबाग सिंह यांनी सांगितले.

लष्कर- ए -मुस्तफाचा (एलइएम) दहशतवादी हिदायतुल्ला मलिक आणि द रझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) दहशतवादी झरूर अहमद राठेर यांच्या अटकेबाबत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत दिलबाग सिंह यांनी ही माहिती उघड केली. मलिक याला ६ फेब्रुवारीला आणि राठेर याला १३ फेब्रुवारीला अटक करण्यात आली होती. एलइएम आणि टीआरएफ हे दोन दहशतवादी गट पाकिस्तानातील जैश- ए- मोहम्मद आणि लष्कर- ए- तोयबाचे आघाडीवरील गट आहेत. दहशतवादी कारवायांसाठी त्यांना काश्मिरी नावे देण्यात आली आहेत, असेही सिंह यांनी सांगितले.