‘आयएसआय’च्या संचालनालयाचा आदेश; पठाणकोट हल्ल्यासाठी दहशतवाद्यांना प्रशिक्षणासाठी वापर

पठाणकोट हवाई तळावर हल्ला करणाऱ्या जैश-ए-मोहम्मद या संघटनेच्या चमूला प्रशिक्षण देण्यासाठी वापरला गेलेला एक गुप्त तळ दुसरीकडे हलवण्याचा आदेश पाकिस्तानातील आयएसआयच्या संचालनालयाने दिला असल्याची माहिती सरकारमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दिली आहे.

मौजगड किल्ल्याच्या परिसरातील हा तळ जैशच्या निवडक गटांना विशेष मोहिमांसाठी प्रशिक्षण देण्यासाठी वापरण्यात आलेला असल्याचे भारतीय गुप्तचर यंत्रणांचे मत आहे. आता ही प्रशिक्षण केंद्रे शस्त्रांविना येथून ६२ किलोमीटर अंतरावरील जैशच्या मुख्यालयात हलवण्यात आली असल्याचे गुप्तचर सूत्रांनी सांगितले.

व्यावसायिक उपयोगासाठी वापरल्या जाणाऱ्या उपग्रहांमार्फत मिळालेल्या प्रतिमांवरून, तसेच हौशी छायाचित्रांवरून किल्ल्याच्या पडझड झालेल्या भिंतींच्या मागे बांधण्यात आलेली दोन मोठी संकुले दिसतात. यापैकी एक पूर्वेकडे, तर दुसरा दक्षिणेकडे असून प्रत्येकाचे क्षेत्रफळ सुमारे ७५० चौरस मीटर आहे.

२०११ सालापर्यंत पर्यटक अधूनमधून मौजगड किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असत, मात्र आता त्यांची संख्या फारच कमी आहे. पडक्या भागापलीकडील इमारती पाहण्यासाठी जाऊ इच्छिणाऱ्या लोकांना साध्या वेशातील माणसांनी तिकडे जाऊ दिले नाही, असे स्थानिक पत्रकारांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले. सीमेपलीकडे घुसखोरी करण्याचे डावपेचात्मक प्रशिक्षण देण्यासाठी मौजगड किल्ल्याच्या परिसराचा वापर करण्यात येत असल्याची भारतीय गुप्तचर यंत्रणांची माहिती आहे.