पुलवामासह भारतात आतापर्यंत वेगवेगळे दहशतवादी हल्ले घडवून आणणाऱ्या जैश-ए-मोहम्मद आणि आयएसआयच्या अधिकाऱ्यांमध्ये गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. जैश-ए-मोहम्मदची सूत्रे संभाळणारा अब्दुल रौफ असगर आणि ISI च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये २० ऑगस्ट रोजी रावळपिंडी येथे बैठक झाली आहे. या बैठकीची माहिती मिळाल्यापासून भारतीय गुप्तचर यंत्रणा हाय अलर्टवर आहेत.

गुप्तचरांच्या माहितीनुसार, अब्दुल रौफ असगरचा भाऊ मौलाना अम्मारही उपस्थित होता. अब्दुल रौफ असगर जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ आहे. बालाकोट एअर स्ट्राइकनंतर मौलाना अम्मारने एक ऑडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. त्यात त्याने इंडियन एअर फोर्सचे फायटर पायलट अभिनंदन वर्थमान यांची सुटका केल्याबद्दल पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका केली होती. जैशच्या तालीम-अल-कुरान मदरशाला लक्ष्य केल्याबद्दल बदला घेण्याची धमकी सुद्धा दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

इस्लामाबादच्या जैश मरकजमध्ये जैशचा ऑपरेशनल कमांडर मुफ्ती असगर खान काश्मिरी आणि कारी झरार यांच्यात भारतावरील हल्ले तीव्र करण्याच्या योजनेसंबंधी बैठक झाली होती. त्यानंतर आता रावळपिंडीमध्ये अब्दुल रौफ असगर आणि ISI च्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये बैठक झालीय असे गुप्तचर अधिकाऱ्याने सांगितले. ही बैठक यासाठी महत्त्वपूर्ण आहे, कारण मागच्यावर्षी पुलवामा हल्ल्याच्या महिनाभरआधी याच लोकांमध्ये अशाच प्रकारची बैठक झाली होती.

आणखी वाचा- जर्मनीचा पाकिस्तानला झटका, पाणबुडया लपवण्यासाठी नाही करणार मदत

२०१६ साली लष्कराच्या नागरोटा लष्करी तळावर हल्ला झाला होता. हाच कारी झरार या हल्ल्याचा कमांडर होता. मौलाना मसूद अझरला गंभीर आजाराचे निदान झाल्यापासून त्याचा भाऊ अब्दुल रौफ असगरच जैशची सगळी सूत्रे संभाळत आहे.