इंडियन एअर फोर्सने पीओकेमधील बालकोट येथे हवाई हल्ला करुन जैश-ए-मोहम्मदचा सर्वात मोठा तळ नष्ट केला आहे. या कारवाईत मोठया संख्येने जैशचे दहशतवादी, ट्रेनर, सिनियर कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

देशाच्या वेगवेगळया भागत आत्मघातकी दहशतवादी हल्ला घडवून आणण्यासाठी बालकोटमधील जैशच्या तळावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यासाठी आत्मघातकी हल्लेखोरांना तयार करण्यात येत होते. खात्रीलायक गुप्तचरांकडून ही माहिती मिळाली होती. त्यामुळे ही कारवाई आवश्यक होती. या कारवाईत भारताने जैशचा सर्वात मोठा तळ उडवला असे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

जैशचा म्होरक्या मसूद अझरचा मेहुणा मैलाना युसूफ अझहर हा कॅम्प चालवत होता. दहशतवादाविरुद्ध लढण्यासाठी भारत पूर्णपणे कटिबद्ध आहे असे विजय गोखले यांनी सांगितले . खासकरुन जैशच्या तळांवरच हा हल्ला करण्यात आला. हल्ल्याच्यावेळी सर्वसामान्यांना झळ बसणार नाही  याची काळजी घेण्यात आली. जंगलात आतमधल्या भागात हे तळ होते असे विजय गोखले यांनी सांगितले.