एस. जयशंकर यांनी गुरुवारी परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे स्वीकारली. सुजाता सिंग यांचा कार्यकाळ अकस्मात कमी करून जयशंकर यांना त्या जागी नेमण्याच्या सरकारच्या कृतीवर काँग्रेसने टीका केली आहे.
परराष्ट्र धोरणाबाबत सरकारचे जे प्राधान्य आहे, तेच माझ्यासाठीही आहे. त्यामुळे आताच त्याबाबत विचार करू नये असे मला वाटते. ही एक मोठी जबाबदारी असून, माझ्यावर ती सोपवण्यात आल्यामुळे माझा मोठाच सन्मान झाला आहे, असे १९७७च्या तुकडीचे आयएफएस अधिकारी असलेले जयशंकर यांनी त्यांच्या आकस्मिक नेमणुकीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
जयशंकर यांनी साऊथ ब्लॉकमधील कार्यालयात पदाची सूत्रे स्वीकारली, त्या वेळी सुजाता सिंग उपस्थित नव्हत्या. नियमानुसार जयशंकर यांना दोन वर्षांचा कार्यकाळ मिळणार आहे. परराष्ट्र सचिवपदी नियुक्तीपूर्वी सिंग हे भारताचे अमेरिकेतील राजदूत होते. त्यापूर्वी त्यांनी चीन, सिंगापूर आणि झेकोस्लोव्हाकिया प्रजासत्ताक या देशांचे राजदूत म्हणूनही काम पाहिले होते.
गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अमेरिकेला भेट आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा नुकताच आटोपलेला भारत दौरा यात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जयशंकर यांची या पदावर नियुक्ती करण्याचा निर्णय मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने काल रात्री घेतला.
दरम्यान, अद्याप आठ महिन्यांचा कार्यकाळ शिल्लक असलेल्या सिंग यांना हटवून जयशंकर यांना नेमण्याच्या कृतीवर काँग्रेसने टीका केली असून, परराष्ट्र सेवेतील अधिकारी देवयानी खोब्रागडे यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेची ‘शिक्षा’ म्हणून हा निर्णय घेण्यात आला काय, असा प्रश्न विचारला आहे. तथापि, भाजपने सिंग यांना हटवण्याचे समर्थन केले असून, सरकारने आपल्या अधिकारक्षेत्रातच कृती केली असल्याचे म्हटले आहे.

अणूकरार, चीनशी द्विपक्षीय संबंध आणि जयशंकर
अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना प्रजासत्ताकदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रण देण्याची कल्पना भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची असो, मात्र त्याला मूर्त स्वरूप देण्याचे श्रेय जाते सुब्रह्मण्यम जयशंकर यांना. प्रजासत्ताक दिनाचे महत्व, त्या दिवशी होणारे लष्करी संचलन वगरेची महती जयशंकर यांनी व्हाइट हाऊसला पटवून दिली. सात वष्रे रखडलेला अणुऊर्जा करारही जयशंकर यांच्यामुळेच मार्गी लागला, असे म्हटले तरी त्यात अतिशयोक्ती ठरणार नाही. दिल्लीतच जन्मलेले जयशंकर दिल्ली विद्यापीठाच्या सेंट स्टीफन्स महाविद्यालयाचे विद्यार्थी. राज्यशास्त्रात एमए आणि एम. फिल आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आण्विक मुत्सद्देगिरी या विषयात केलेले पीएच. डी यातूनच जयशंकर यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची ओळख पटावी. १९७७ मध्ये त्यांचा भारतीय परराष्ट्र सेवेत (आयएफएस) प्रवेश झाला. साडेतीन दशकांच्या त्यांच्या परराष्ट्र सेवेत जयशंकर यांनी चीन, झेक प्रजासत्ताक, सिंगापूर, अमेरिका आदी देशांमध्ये काम केले आहे. चीनमध्ये तर ते तब्बल साडेचार वष्रे भारतीय राजदूत होते. त्यांच्याच काळात चीनशी असलेल्या सीमावादावर तोडगा दृष्टिपथात येऊ लागला. मनमोहन सिंग सरकारच्या काळात अगदी अलीकडे म्हणजे सप्टेंबर, २०१३ मध्ये त्यांची अमेरिकेतील भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली. मात्र, ओबामा यांचा भारत दौरा यशस्वी करून दाखवल्याची बक्षिसी म्हणूनही असेल किंवा अमेरिकेशी अधिकाधिक सलगी साधण्याचा प्रयत्न म्हणूनही असेल आता एस. जयशंकर यांना मोदी सरकारने परराष्ट्र सचिव पदावर नियुक्त केले आहे. जयशंकर यांना तब्बल दोन र्वष मिळणार आहेत या पदावर काम करण्यासाठी. या दोन वर्षांत अणुकरार मार्गी लावून चीनशी असलेल्या कटुगोड संबंधांना आणखी नवे आयाम देण्याचा जयशंकर यांचा म्हणजेच मोदी सरकारचा प्रयत्न असेल.