कोकणातील जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे काम येत्या दोन वर्षांत सुरू केले जाईल असे सूतोवाच फ्रान्सच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्यात दोन करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याने आता जैतापूर प्रकल्पास गती मिळण्याची चिन्हे आहेत. भारतीय अणुऊर्जा महामंडळ व अरिवा कंपनी यांच्यात फ्रान्समध्ये अभियांत्रिकीपूर्व करारावर स्वाक्षऱ्या झाल्या असून त्यात तांत्रिक व आर्थिक सोपस्कार पूर्ण करण्यात आले.
अरिवा कंपनीने लार्सन अँड टुब्रो कंपनीबरोबरही करार केला असून त्यात अणुभट्टीसाठी लागणारी उपकरणे विकसित केली जाणार आहेत. फ्रान्सच्या दूतावासातील अणु सल्लागार सुनील फेलिक्स यांनी सांगितले, की अणुभट्टीची पन्नास टक्के सामग्री भारतातच तयार होईल व नंतर ७५ टक्के उत्पादन पुढच्या टप्प्यात आम्ही करू . दर युनिटमागे साडेसहा रुपयांच्या पुढे दर गेला, तर आम्हाला फ्रान्सची मदतच नको असे भारताने स्पष्ट केले आहे. काम केव्हा सुरू होईल असे विचारले असता फेलिक्स यांनी सांगितले, की दोन वर्षांत प्रत्यक्ष काम सुरू होईल. दायित्वाच्या मुद्दय़ावर भारत सरकार सध्या काम करीत आहे.