डीडीसीए घोटाळा प्रकरणी आरोप करून बदनामी केल्याच्या प्रकरणी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व आम आदमी पक्षाच्या पाच नेत्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाची बदनामीची फिर्याद दाखल केली आहे. त्यात त्यांनी दहा कोटी रूपयांची भरपाई व या आप नेत्यांवर बदनामीच्या आरोपाखाली खटला चालवण्याची मागणी केली आहे, या गुन्ह्य़ात कमाल दोन वर्षे तुरूंगवासाची शिक्षा आहे. जेटली यांनी दिवाणी व फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या फिर्यादी दाखल केल्याचे समजते.
मुख्य महानगर दंडाधिकारी संजय खंडेलवाल यांनी सांगितले, की आताची तक्रार ही व्यक्तिगत पातळीवर दाखल केली आहे व त्यातील नोंदी पाहून आम्ही गुन्ह्य़ाची दखल घेतली आहे. आता याबाबत पुरावे दाखल करण्यासाठी ५ जानेवारी ही तारीख ठेवण्यात आली आहे.
वरिष्ठ वकील सिद्धार्थ लुथरा यांनी जेटली यांच्या वतीने न्यायालयाला सांगितले, की आम आदमी पक्षाच्या नेत्यांनी केलेले आरोप निराधार असून अर्थमंत्री जेटली यांची त्यांनी डीडीसीए प्रकरणात बदनामी केली आहे. डीडीसीए संघटनेत असताना जेटली यांनी एका पैशाचाही घोटाळा केलेला नाही, त्यामुळे आम आदमी पक्षाचे आरोप बेछूट व निराधार आहेत. पस्तीस मिनिटांच्या सुनावणीत जेटली यांच्यासह केंद्रीय मंत्री एम.व्यंकय्या नायडू, जे.पी.नड्डा, स्मृती इराणी, धर्मेद्र प्रधान, पीयूष गोयल व राज्यवर्धन सिंह राठोड न्यायालयात उपस्थित होते.
केजरीवाल यांच्याशिवाय जेटली यांनी कुमार विश्वास, आशुतोष, संजय सिंह, राघव चढ्ढा, दीपक बाजपेयी यांच्यावरही बदनामी केल्याचा खटला दाखल केला आहे.