सरकारी बॅंकांच्या कर्जाची परतफेड थकवून मद्यसम्राट विजय मल्ल्या परदेशात निघून गेल्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी राज्यसभेत विरोधकांनी सरकारला जाब विचारला. त्यावर उत्तर देताना राज्यसभेचे सभागृह नेते आणि केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी केंद्रीय अन्वेषण विभागाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, त्यांचा शोध घेण्याची नोटीस मिळण्याअगोदरच त्यांनी देश सोडला होता, असे सांगितले.
जेटली म्हणाले, बॅंकांची थकीत कर्जे वसुल करण्यासाठी काँग्रेसने आपल्या दहा वर्षांच्या सत्ताकाळात काहीही प्रयत्न केले नाहीत. पण आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर गेल्या काही महिन्यांतच मल्ल्या यांच्या विविध मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. मल्ल्या यांनी दोन मार्चलाच देश सोडला आहे. त्यानंतर त्यांचा शोध घेण्यासंबंधीची नोटीस जारी करण्यात आली होती. बॅंकांनी या प्रकरणात मल्ल्या यांना देश सोडून जाण्यापासून रोखण्यात यावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्याआधीच त्यांनी देश सोडला होता, याकडेही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
मल्ल्या यांच्या विविध मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यांच्याकडून कर्जाची थकीत रक्कम वसूल करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जेटली यांनी सांगितले.
स्टेट बँक ऑफ इंडियासह एकूण पंधरा बँकांनी मल्ल्या यांना परदेशात जाण्यापासून रोखावे, या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीत ते अगोदरच ब्रिटनला निघून गेले असल्याचे स्पष्ट झाले. विविध बँकांचे ९ हजार कोटी रुपये थकवले असताना आणि बंगळुरू व गोव्यातही कर्जवसुली लवादासमोर खटले दाखल असताना मल्या यांना परदेशात जाण्यापासून सरकारी यंत्रणेने रोखले नसल्याचे या निमित्ताने उघड झाले. न्यायालयाने मल्या यांना नोटीस जारी केली असून त्यांना दोन आठवडय़ात उत्तर देण्यास सांगितले आहे.