राजधानी जकार्ता लक्ष्य; सात जण ठार; आयसिसने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली

इंडोनेशियाची राजधानी जाकार्तामध्ये गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच हल्लेखोरांसह सात जण ठार तर २० जण जखमी झाले. हल्ला झाला त्या भागात अमेरिका, फ्रान्स आणि स्पेनसह अनेक देशांचे दूतावास आणि संयुक्त राष्ट्रांच्या अनेक समित्यांची कार्यालये आहेत. या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे.

जकार्तातील तामरिन मार्गावरील सरिना शॉपिंग मॉल हा गजबजलेला परिसर आहे. या परिसरात स्टारबक्स या अमेरिकी कॉफी शॉपसह अमेरिका, फ्रान्स व स्पेन या देशांचे दूतावास आहेत. याच परिसराला लक्ष्य केले.  अंगाभोवती स्फोटके लपेटलेल्या तीन हल्लेखोरांनी  स्टारबक्समध्ये घुसत पहिला स्फोट केला. त्यानंतर उर्वरितांनी अंदाधुंद गोळीबाराला सुरुवात केली. दोन परदेशी नागरिकांना ओलीसही ठेवण्यात आले. अल्जेरिया व कॅनडाचे हे दोन्ही नागरिक होते. त्यातील एकाने हल्लेखोरांपासून सुटका करून घेण्यात यश मिळवले. परंतु हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबाराततो जखमी झाला. तर त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात एक जण ठार झाला. या हल्ल्यात आणखी एक जण ठार झाला. त्यानंतर दहशतवाद्यांनी एका दुचाकीवरून परिसरातील एका पोलीस ठाण्यात प्रवेश केला व तेथे स्फोट घडवून आणला. त्यात चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. अंदाधुंद गोळीबारात २० जण जखमी झाले. हल्ल्याचे वृत्त समजताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला. हल् लेखोर आणि सुरक्षा दले यांच्यात तुंबळ धुमश्चक्री झाली. तीत पाचही दहशतवादी ठार झाले.

दरम्यान, या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. खिलाफतच्या शूर सैनिकांनी जकार्तातील हल्ला घडवून आणला असून त्यांचा आम्हाला अभिमान असल्याचे आयसिसने स्पष्ट केले आहे. प्रथमत या हल्ल्यात इंडोनेशियातील जिहादी बहरूम नईम याचा हात असल्याचा जकार्ता पोलिसांना संशय होता.

अध्यक्षांचे आवाहन

इंडोनेशियाचे अध्यक्ष जोको विडोडो यांनी आयसिसच्या या हल्ल्याची कठोर शब्दांत निर्भर्त्सना करत देशवासीयांनी अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरून जाण्याचे काहीच कारण नसल्याचे स्पष्ट केले. या दहशतवादाचा मुकाबला करण्यास आपला देश समर्थ असल्याचेही विडोडो यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, अमेरिकेनेही या हल्ल्याचा निषेध केला असून दहशतवादी या प्रकारच्या हल्ल्यांच्या माध्यमातून स्वतचेच मरण ओढवून घेत असल्याची प्रतिक्रिया अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांनी लंडन येथे बोलताना व्यक्त केली.  इंडोनेशियामध्ये जिहादी शक्तींनी आतापर्यंत अनेक बॉम्बस्फोट घडवून आणल्याकडेही केरी यांनी यावेळी लक्ष वेधले.