जलीकट्टूच्या समर्थनार्थ अमेरिकेतील तामिळी लोकांनी येथील गांधी पुतळय़ाजवळ जमून आंदोलन केले. जलीकट्टूवरील बंदी उठवण्यासाठी येथे सभा घेण्यात आली. या वेळी शेकडो तामिळ अमेरिकी उपस्थित होते. व्हर्जिनियातील नोरफोक येथे त्यांनी पेटा या प्राणीहक्क संघटनेच्या मुख्यालयासमोर निदर्शनेही केली. महिला, पुरुष व मुले यांचा आंदोलनात सहभाग होता. त्यांनी जलीकट्टूच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. पीपल फॉर एथिकल ट्रीटमेंट ऑफ अ‍ॅनिमल्स म्हणजे पेटा या संघटनेविरोधात त्यांनी टीका केली. पेटा या संघटनेच्या याचिकांमुळे जलीकट्टूवर तामिळनाडूत बंदी घालण्यात आली होती. पेटाविरोधी निदर्शक बाबू विनयगम यांनी सांगितले, की आमचे आमच्या प्राण्यांवर प्रेम आहे, त्यांना कसे वागवायचे ते आम्हाला चांगले कळते, तो आमच्या परंपरा व संस्कृतीचा भाग आहे. वॉशिंग्टन येथे भारतीय दूतावासाबाहेर गांधीजींचा पुतळा असून तेथे तामिळी लोकांनी निदर्शने केली. भारतात आंदोलन करणाऱ्या आमच्या बांधवांशी एकनिष्ठता दाखवण्यासाठी आम्ही हे आंदोलन केले असे त्यांनी सांगितले. बहुतांश घोषणा या तामिळ भाषेत होत्या, पण आंदोलक डाऊन डाऊन पेटा अशा घोषणा देत होते. तामिळनाडूतून आलेले माहिती तंत्रज्ञान व्यावसायिक विनोद कुमार यांनी सांगितले, की जलीकट्टूला परवानगी दिली पाहिजे. कायदेशीर तरतुदी करून अनेक शतकांची ही परंपरा पुढे सुरू ठेवली पाहिजे. अलीकडच्या काळात भारतीय दूतावासापुढे हा सर्वात मोठा निषेध मोर्चा व मेळावा होता. पेटाच्या व्हर्जिनियातील नॉरफोक येथे असलेल्या मुख्यालयासमोर निदर्शने झाल्याचे एबीसी निगडीत स्थानिक वाहिनीने म्हटले आहे. पेटाने न्यायालयाच्या निर्णयावर प्रभाव टाकला आहे त्यामुळे आम्ही निदर्शने करीत आहोत असे आंदोलकांनी सांगितले. पेटाने त्यांच्या निवेदनात म्हटले आहे, की निदर्शक न्यायालयाचा निर्णय मानायला तयार नाहीत. स्पेनमध्ये बैलांची झुंज होते तर ब्रिटनमध्ये कोल्हय़ांची  शिकार केली जाते, ते प्रकार आता बंद करण्यात आले आहेत, त्यामुळे संस्कृतीच्या नावाखाली जलीकट्टूसारखे प्रकार चालवणे योग्य नाही.