27 September 2020

News Flash

Khashoggi Murder Case: सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी अखेर मौन सोडले

सौदी अरेबियात प्रतिष्ठेची आर्थिक परिषद सुरू असून त्यावर खाशोगी खून प्रकरणाची छाया होती. या परिषदेत बुधवारी सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांच्या

संग्रहित छायाचित्र

सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांच्या मृत्यूसंदर्भात सौदी अरेबियाचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी अखेर मौन सोडले आहे. खाशोगी यांची हत्या ही निंदनीय घटना असून या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा दिली जाईल, असे मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितले.

अमेरिकेत वास्तव्यास असलेले सौदी अरेबियाचे पत्रकार, सौदी राजवटीवरील टीकाकाकर जमाल खाशोगी हे २३ दिवसांपूर्वी तुर्कस्तानमधील सौदी अरेबियाच्या दुतावासात गेले होते. तिथेच त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. खाशोगी हे ‘द वॉशिंग्टन पोस्ट’चे आखाती राजकारणविषयक स्तंभलेखक/पत्रकार होते. सौदी राजवटीवर त्यांनी अनेकदा टीका केली होती. यामुळे या प्रकरणात संशयाची सुई राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे वळली होती.

सौदी अरेबियात प्रतिष्ठेची आर्थिक परिषद सुरू असून त्यावर खाशोगी खून प्रकरणाची छाया होती. या परिषदेत बुधवारी सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी खाशोगी यांच्या मृत्यूसंदर्भात भाष्य केले. ‘खाशोगी यांची हत्या ही निंदनीय आणि घृणास्पद घटना आहे. सौदीतील प्रत्येकासाठी ही एक दु:खद घटना आहे. सौदी अरेबिया खाशोगी यांच्या हत्येचा सखोल तपास करेल आणि दोषींना न्यायालयात कठोर शिक्षा व्हावी, यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले.

याच परिषदेच्या पहिल्या दिवशी सौदी अरेबियाचे ऊर्जा मंत्री खालीद अल फलीह यांनी देखील खाशोगी यांच्या हत्येबाबत भूमिका स्पष्ट केली होती. आमच्यासाठी हा अतिशय कठीण काळ आहे. सौदी अरेबियातील कुणीही खाशोगीच्या मृत्यूचे समर्थन करीत नाही, देशाच्या वरिष्ठ नेत्यांपासून सर्वानाच झाल्या घटनेबाबत अस्वस्थता वाटते आहे असे ते म्हणाले होते.

सौदीच्या राजपुत्रांनी स्पष्टीकरण देण्यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील खाशोगी हत्या प्रकरणाबाबत भाष्य केले होते. ‘खाशोगी यांच्या मारेकऱ्यांना आता अडचणींचा सामना करावा लागणार आहे’ असे त्यांनी सांगितले होते. ‘सौदी राजघराण्याची धूरा सध्या राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्याकडे आहे. शेवटी तिथे जे काही होणार त्याची जबाबदारी सलमान यांच्यावरच आहे’, असे सूचक विधान करत त्यांनी खाशोगी यांच्या हत्येमागे राजपुत्राचा सहभाग असू शकतो असे म्हटले होते. तर तुर्कस्तानने या हत्याकांडासाठी सौदी अरेबियाला जबाबदार ठरवले होते. खाशोगी यांची हत्या म्हणजे शांत डोक्याने रचलेला एक कट होता, असे तुर्कस्तानने म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2018 5:06 am

Web Title: jamal khashoggi murder case saudi crown prince mohammed bin salman break silence
Next Stories
1 राफेल घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करा; यशवंत सिन्हांची सुप्रीम कोर्टात याचिका
2 अमेरिकेत राजकीय हिंसेला थारा नाही: राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प
3 लैंगिक छळ रोखण्यासाठी मंत्रिगट स्थापन
Just Now!
X