‘टायटॅनिक’,  ‘अवतार’ आणि ‘ब्रेव्हहार्ट’ या गाजलेल्या हॉलीवूड चित्रपटांचे संगीत दिग्दर्शक जेम्स हॉर्नर यांचे सोमवारी विमान अपघातात निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. कॅलिफोर्नियामधील व्हेंच्युरा कौंटीमध्ये स्थानिक प्रमाणवेळेनुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता हॉर्नर यांच्या खासगी विमानाला अपघात झाला.
हॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी संगीतकारांमध्ये हॉर्नर यांचे नाव आदराने घेतले जाते. १९९७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘टायटॅनिक’ या चित्रपटाच्या संगीतासाठी त्यांना दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले होते. या चित्रपटातील ‘माय हार्ट विल गो ऑन’ हे प्रचंड गाजलेले गाणेही हॉर्नर यांचेच होते. ‘अवतार’, ‘ब्रेव्हहार्ट’, ‘अ ब्युटिफुल माईंड’, ‘अॅन अमेरिकन टेल’, ‘फिल्ड ऑफ ड्रिम्स’, ‘अपोलो १३’ या हिट चित्रपटांना त्यांनी संगीत दिले होते. त्यांना आतापर्यंत १० वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे.