सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येत मशीद उभारण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठाच्या आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख एम. एस. अख्तर अयोध्येत बांधण्यात येणाऱ्या मशिदीचे आणि त्याच्याजवळ उभारण्यात येणाऱ्या कॉम्प्लेक्ससाठीचं डिझाइन तयार करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे मशीद बांधण्यासाठी अयोध्येत जागा देण्यात आलेली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अयोध्येत मशीद उभारण्यासाठी धनीपुर गावात पाच एकर जागा देण्यात आली आहे. या ठिकाणी मशिद आणि कॉम्प्लेक्स बनवण्यासाठी एम. एस. अख्तर यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती जामिया विद्यापीठाच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली. मशिद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्माण केलेल्या इंन्डो इस्लामिक कल्चर या ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी एम. एस. अख्तर यांची निवड केली आहे.

‘संपूर्ण परिसराचे डिझाइन एकत्रितरित्या करण्यात येणार आहे. यामध्ये मशिदीचा भागही असणार आहे. कॉम्प्लेक्समध्ये कोण कोणत्या गोष्टी असणार हे अद्याप नक्की झालेले नाही. मात्र एक रुग्णालय असेल, अशी आशा आहे. या कॉम्प्लेक्सचा मूळ हेतू हा मानवता आणि समाजाची सेवा हा असणार आहे. हा फक्त मशीद निर्माण करण्याचा प्रश्न नाही. सरकारने दिलेल्या जागेवरच हा सर्व परिसर निर्माण करण्यात येणार आहे. याचा मूळ उद्देश भारतातील सामाजिक वर्तन आणि इस्लामच्या भावनेला एकत्र आणण्याचा आहे,’ असं अख्तर यांनी सांगितले.

अयोध्येतील मशीद बांधण्यासाठी सुन्नी वक्फ बोर्डकडून निर्माण केलेल्या इंन्डो इस्लामिक कल्चर ट्रस्टद्वारे या सर्व कामकाजावर लक्ष ठेवण्यात येणार आहे.