13 August 2020

News Flash

जामिया विद्यापीठ आंदोलन: चेतन भगतने दिला मोदी सरकारला इशारा, म्हणाला…

चेतन भगत यांनी सरकारच्या निर्णयांवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे

चेतन भगतने दिला मोदी सरकारला इशारा

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकाविरोधात रविवारी दिल्लीतील जामिया विद्यापीठाच्या परिसरात जोरदार निदर्शनं झाली व हिंसाचार उफाळला होता. या पार्श्वभूमीवर रात्री उशीरा ताब्यात घेण्यात आलेल्या जवळपास ५० निदर्शकांना सोमवारी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी सोडले आहे. दुसऱ्या दिवशीही जामिया विद्यापीठामधील वातावरण तापलेले आहे. अशाच आता भाजपाचा समर्थक समजला जाणारा आणि तरुणाईमध्ये लोकप्रिय असणारा लेखक चेतन भगत याने सरकारला एक इशारा दिला आहे. इतकच नाही तर त्याने सरकारच्या निर्णयांवरही प्रश्न चिन्ह उपस्थित केलं आहे.

नागरिकत्व दुरूस्ती विधेयकावरुन जामिया विद्यापीठामध्ये झालेल्या हिंचारावरुन चेतन भगतने सरकारला तरुणांच्या संयमची परिक्षा घेऊ नका असा इशारा दिला आहे. “गडगडणारी अर्थव्यवस्था. कमी नोकऱ्या उपलब्ध असणे. इंटरनेट बंद करणे. पोलिसांना वाचनालयामध्ये घुसवणे. तरुणांकडे संयम नक्कीच आहे. पण त्यांच्या संयमीची परिक्षा पाहू नका,” असं ट्विट चेतन भगतने केलं आहे.

या ट्विटमधून चेतन भगतने, “देशामधील तरुणाईला चिंता वाटेल अशा अनेक गोष्टी घडत आहेत. तरी तरुणाईचा संयम ठासाळलेला नाही. असं असलं तरी या संयमाची परिक्षा घेतली जाऊ नये,” अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेची पडझड होत असल्याच्या बातम्या मागील अनेक आठवड्यांपासून समोर येत आहेत, त्याचबरोबर देशामधील वाढती बेरोजगारीही चिंतेचा विषय आहे याकडे चेतन भगतने लक्ष वेधलं आहे. देशामधील वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी सरकारकडून इंटरनेट सेवा बंद केली जात आहे. मागील काही महिन्यांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर, आसाममध्ये नागरिकत्व दुरूस्ती विधेयावरुन हिंसाचार झाल्यानंतर इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. आजही नागरिकत्व दुरूस्ती विधेयावरुन सुरु असलेल्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अलीगढ, मेरठ आणि पश्चिम बंगालमधील काही भागांमधील इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे.

आपल्या ट्विटमध्ये त्याने जामिया विद्यापीठाच्या वाचनालयामध्येही घुसून पोलिसांनी विद्यार्थ्यांना मारहण केल्याचा संदर्भ देत या गोष्टीचा निषेध केला आहे. पोलिसांनी विद्यापीठाच्या आवारातील मशीदीमध्ये, कॅनटीनमध्ये आणि वाचनालयामध्ये घुसून विद्यार्थ्यांना कारण नसताना मारहाण केली. यापैकी अनेक विद्यार्थ्यांचा आंदोलनाशी काहीच संबंध नसताना त्यांना मारहाण करण्यात आल्याचा आरोप जामिया विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी केला आहे.

या ट्विटबद्दल नंतर स्पष्टीकरण देताना चेतन भगतने इतरही काही ट्विट केले आहेत. आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये त्याने यासंदर्भातील राजकीय भूमिकेपेक्षा मला भारताची अधिक चिंता असल्याचे म्हटले आहे. “येथील माझ्या राजकीय भूमिकेबद्दल अनेकजण संभ्रमात पडले आहेत. मला इतकचं सांगायचं आहे की, ज्या भारतामध्ये सर्वजण गुण्यागोविंदाने राहतात तेथील अर्थव्यवस्था सक्षम असावी असे माझे स्वप्न आहे. एकाच बाजूने गटबाजी करणे मला कंटाळवाणे वाटते. मी कधीच एका बाजूने असेल असं नाही. मी भारताच्या बाजूने आहे आणि मला त्याचा अभिमान आहे,” असं चेतन भगतने म्हटलं आहे.

तसेच पुढच्या ट्विटमध्ये चेतन भगतने देशातील सर्व विद्यापिठांना संरक्षण मिळायला हवे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. “विद्यापिठांचे नाव काहीही असलं तरी ती विद्यापिठे हिंदू किंवा मुसलीम नाहीत तर ती भारतीय विद्यापिठे आहेत. आणि त्यामुळेच त्या सर्व विद्यापिठांना संरक्षण मिळायलाच हवं,” असं चेतनने म्हटलं आहे.

आपल्या चौथ्या ट्विटमध्ये चेतनने सरकारच्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “नोटबंदी, जीएसटी, कलम ३७० आणि आता नागरिकत्व दुरूस्ती विधेयक या सर्वांची घोषणा झाल्यानंतर गोंधळ उडाल्याचे पहायला मिळालं. यावरुनच सरकारमध्ये सर्व गोष्टींना केवळ होकार देणारे अधिकारी भरलेले आहेत असं दिसून येत आहे. हे अधिकारी या गोष्टींकडे योग्य पद्धतीने पाहत नाहीत कींवा याबद्दल शंका उपस्थित करत नाहीत अथवा प्रश्नही विचारत नाहीत,” अशी चिंता चेतन भगतने व्यक्त केली आहे.

चेतन भगतने घेतलेल्या या भूमिकेचे नेटकऱ्यांनी स्वागत केल्याचे त्याच्या ट्विटला आलेल्या रिप्लायवरुन दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2019 10:50 am

Web Title: jamia protest dont test the limits of youths patience chetan bhagat warns modi government scsg 91
Next Stories
1 बांगलादेशने भारताकडे मागितली त्यांच्या बेकायदेशीर नागरीकांची यादी
2 दिल्ली हिंसाचार : पोलिसांकडून ५० निदर्शकांची पहाटे सुटका
3 सरकारचे ‘जीम्स’ अ‍ॅप!
Just Now!
X