नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामियाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ जमून शांततेत निदर्शने केली. गर्दीतून एक युवक पुढे येतो आणि कडक पोलीस बंदोबस्त असतानाही गोळीबार करतो हा प्रकार धक्कादायक असल्याचे नमूद करून विद्यार्थ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

‘स्टॉप हेट स्पीच, सेफ्टी रॅली?’, ‘तमाचे पे डिस्को, जामिया से खिसको’ असा मजकूर लिहिलेले फलक या वेळी विद्यार्थ्यांच्या हातात होते. गोळीबाराची माहिती कळली तेव्हा आपण मित्रांसमवेत घटनास्थळी धाव घेतली, आम्हाला शांततापूर्ण निदर्शने करावयाची आहेत, असे एका विद्यार्थ्यांने सांगितले.

नुकसानभरपाईच्या नोटिसा रद्द करण्यासाठी याचिका

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात (सीएए) निदर्शने करण्यात आली. त्यावेळी सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने निदर्शकांवर नोटिसा बजावण्यात आल्या. त्या रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर म्हणणे मांडण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी उत्तर प्रदेश सरकारला दिले.

गोळीबार करणाऱ्याला पैसे कोणी दिले- राहुल

नवी दिल्ली : जामिया मिलिया इस्लामियाजवळ गुरुवारी गोळीबार करणाऱ्या युवकाला कोणी पैसे दिले, असा सवाल शुक्रवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला. गुरुवारी घडलेल्या या घटनेबाबत वार्ताहरांनी राहुल गांधी यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी, गोळीबार करणाऱ्या युवकाला कोणी पैसे दिले, असा सवाल केला.

सत्ताधाऱ्यांच्या चिथावणीमुळे असे प्रकार- प्रियंका

नवी दिल्ली : सत्तारूढ पक्षाचे नेते जनतेला गोळीबार करण्याची चिथावणी देतात त्यामुळे अशा घटना घडणे शक्य आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी गुरुवारी जामियाबाहेर एका युवकाने केलेल्या गोळीबारप्रकरणी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हिंसाचारावर विश्वास आहे की अहिंसेवर याचे त्यांनी उत्तर द्यावे, असेही त्या म्हणाल्या.