नाव फरहान वानी… वय १५ वर्ष… जून २०१७ मध्ये फरहान हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनेत भरती झाला….वडिलांच्या आवाहनानंतरही तो घरी परतला नव्हता…चकमकीचे नाव ऐकताच फरहानची आई देवाकडे प्रार्थना करायची… पण मंगळवारी त्याच्या आईची भीती खरी ठरली… चकमकीत फरहानचा मृत्यू झाला आणि मुलाच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याच्या आईला अश्रू आवरता आले नाही.

मंगळवारी जम्मू-काश्मीरमधील कोकरनाग येथे चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. यामध्ये १५ वर्षांच्या फरहान वानीचा समावेश आहे. फरहान हा कुलगाम जिल्ह्यातील रहिवासी होता. अकरावीत शिकणारा फरहान गेल्या वर्षी १४ जून रोजी घरातून क्लासला जाण्यासाठी निघाला. मात्र, यानंतर तो कधी घरी परतलाच नाही. फरहान हिज्बुलमध्ये भरती झाल्याचे काही दिवसांमध्ये स्पष्ट झाले.

फरहान दहशतवादी संघटनेत भरती झाल्याचे समजताच त्याचे वडील गुलाम मोहम्मद वानी यांनी फेसबुकवर फरहानसाठी भावनिक पोस्ट टाकली होती. मोहम्मद वानी हे शिक्षक आहेत. ‘फरहान, तू गेल्या पासून माझ्या शरीराने माझी साथ सोडली आहे. तू मला वेदना दिल्या आहेत. पण तू एक दिवस नक्की घरी परत येशील. मला एवढ्या लवकरच मरायची इच्छा नव्हती. पण तू आता माझ्यासमोर दुसरा पर्याय उरलेला नाही. मला माफ कर, तुला आयुष्यात अजून खूप शिकायचं आहे. पण ते शिकवण्यासाठी मी या जगात नसेन’ असे त्यांनी म्हटले होते.

दहावीत चांगले गूण मिळवणारा माझा मुलगा ही पोस्ट वाचून घरी परत येईल, असे मोहम्मद वानी यांना वाटत होते. त्यांनी फरहानला आईची आठवणही करुन दिली. ‘या जगात तुझ्यावर सर्वात जास्त प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे तुझी आई. तुला जन्म देताना तिला खूप वेदना होत होत्या, पण म्हातारपणी मुलंच आधार देतील असे तिला कोणीतरी सांगितले होते. त्यामुळे तिने त्या कळा सोसल्या. प्रिय फरहान, तू परत ये. तुला नव्याने आयुष्य सुरु करण्याची संधी आहे. यात आम्ही तुझी मदत करु. तू जो मार्ग निवडला आहेस, तिथे तूला फक्त त्रास, वेदना, धोकाच मिळेल’ असेही त्यांनी म्हटले होते. चकमकीचे नाव ऐकताच फरहानची आई या चकमकीत माझा मुलगा नसू दे अशी प्रार्थना देवाकडे करायची.

मंगळवारी झालेल्या कोकरनागमधील चकमकीत वानीचा मृत्यू झाल्याचे वृत्त ऐकताच वानी कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. कोकरनागमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिसरात शोधमोहीम राबवली असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यातील तीन दहशतवादी पळून गेले. तर फरहानचा चकमकीत मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.