जम्मू- काश्मीरमध्ये तासाभरात दोन दहशतवादी हल्ले झाले असून या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. दोन्ही हल्ले हे पोलिसांच्या ताफ्यावरच झाले असून यातील राजपोरा येथे दहशतवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाल्याचे समजते.

जम्मू- काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांना लक्ष्य केले जात असून शनिवारी दुपारी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला केला. पहिला हल्ला राजपोरा पोलीस ठाण्याजवळ झाला. या हल्ल्यात दोन पोलीस जखमी झाले आहेत. तर दुसरा हल्ला शोपियन येथे इमाम साहब येथे झाला. या हल्ल्यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या दोन्ही हल्ल्यानंतर जम्मू- काश्मीरमधील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांविरोधात सैन्याने मोहीमच सुरु केली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये सैन्याने ८० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. यामुळे दहशतवादी संघटनांकडून सुरक्षा दलांना लक्ष्य करण्याचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जाते. दरम्यान, गुरुवारी दहशतवाद्यांनी भाजप युवा मोर्चाचे नेते गौहर हुसैन भट यांची हत्या केली होती. लष्कर-ए-तोयबा आणि हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांचा या मागे हात असल्याचे समोर आले होते.