जम्मू- काश्मीरमधील उधमपूर येथे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर एका जवानाने क्षुल्लक वादातून सहकाऱ्यांवर गोळीबार केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणाऱ्या जवानाने आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे.

उधमपूर येथील बट्टल बलियान येथे सीआरपीएफचे तळ असून या तळावर सीआरपीएफमधील १८७ बटालियनमधील जवान होते. यातील अजित कुमार या जवानाने बुधवारी रात्री तळावरील तीन सहकाऱ्यांवर गोळीबार केला. स्वतःच्या बंदुकीतून त्याने हा गोळीबार केला. यात त्या तिघांचा मृत्यू झाला. हेड कॉन्स्टेबल पोखरमल (राहणार- झुनझुनू, राजस्थान), योगेंद्र शर्मा (रा- मौजपूर, दिल्ली) आणि उम्मिद सिंह (रा- रेवडी, हरयाणा) अशी या मृतांची नावे आहेत. अजित कुमार आणि या तिघांमध्ये नेमका काय वाद झाला होता हे अजून समजू शकलेले नाही.

साथीदारांवर गोळीबार केल्यानंतर अजित कुमारने स्वतःवर देखील गोळी झाडून घेतली. त्याची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उधमपूर येथील लष्करी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे वृत्त समजताच सीआरपीएफमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.