जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. मृत्यू झालेल्यांपैकी एक दहशतवादी हा जैश- ए- मोहम्मदशी संबंधित होता, तर अन्य दोघे जण हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते.

त्राल भागातील जंगलाच्या उंचावरील भागात किमान दोन दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या ठिकाणी शोधमोहीम हाती घेतली. लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्यानंतर चकमकीला सुरुवात झाली. या मोहिमेत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. तर तीन जवानही यात जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

झुबैर अहमद भट( रा. अवंतीपोरा), शकूर अहमद पर्राय (रा. त्राल) आणि तसवीफ अहमद उर्फ अबू तल्हा (रा. अवंतीपोरा) अशी या तिन्ही दहशतवाद्यांची नावे आहेत. चकमकीचे वृत्त समजताच अवंतीपोरामधील स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले. या दगडफेकीत किमान नऊ जण जखमी झाले आहे. यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना श्रीनगरमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, गेल्या वर्षभरात जम्मू- काश्मीरमध्ये सुरक्षा दलांनी एकूण 260 दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दहशतवाद्यांच्या गोळीबारात एकूण 95 जवान शहीद झाले. यात जम्मू- काश्मीर पोलीस दलातील 45 अधिकाऱ्यांचा समावेश आहे.