जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथील चकमकीनंतर स्थानिक तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली आहे. यानंतर सुरक्षा दलांनी जमावाला पांगवण्यासाठी बळाचा वापर केला आहे. या हिंसाचारात एकूण सहा नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुलाम मोहम्मद यांनी दिली आहे.
पुलवामा येथील सिरनू या गावात दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानुसार शनिवारी पहाटे चारच्या सुमारास पोलीस आणि सैन्याच्या संयुक्त पथकाने या भागात शोधमोहीम राबवायला सुरुवात केली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. तर एक जवान शहीद झाला आहे. या चकमकीनंतर स्थानिक तरुण रस्त्यावर उतरले.
स्थानिक तरुणांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. या हिंसाचारात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलीस उपायुक्त गुलाम मोहम्मद यांनी दिली. या तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या भागात सुरक्षा दलांच्या अतिरिक्त तुकड्या घटनास्थळी रवाना झाला असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. या हिंसाचारात एकूण १५ जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 15, 2018 1:13 pm