जम्मू- काश्मीरमध्ये रमझानच्या काळात शस्त्रसंधी लागू असतानाच दगडफेक करणाऱ्या जमावाला पांगवण्यासाठी सैन्याच्या पथकाला शुक्रवारी बळाचा वापर करावा लागला. सैन्याच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक महिला यात जखमी झाला आहे. ईदच्या एक दिवस अगोदर ही घटना घडल्याने काश्मीरमधील पुलवामा भागात तणावपूर्ण वातावरण होते.

पुलवामामधील नौपोरा या गावात सैन्याच्या पथकाने जमावाला पांगवण्यासाठी केलेल्या गोळीबारात एका महिलेचा मृत्यू झाला. तर एक तरुण जखमी झाला, अशी माहिती जम्मू- काश्मीर पोलिसांनी माध्यमांना दिली. सैन्याचे प्रवक्ते राजेश कालिया यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, सैन्याचे पथक या भागात गस्तीवर होते. नौपोरा येथे एक कार रस्त्यावर पार्क करण्यात आली होती. यामुळे आमच्या पथकाला पुढे जाता येत नव्हते. अखेर पथकातील काही जवान कार मालक आबिद मन्झूर याच्या घराच्या दिशेने जायला निघाले. सैन्याच्या जवानांना बघून तिथे ग्रामस्थ जमले. त्यांनी पथकावर दगडफेक करुन जवानांना घेरले. शेवटी जवानांनी हवेत गोळीबार केला आणि स्वतःची सुटका करुन घेतली, असे कालिया यांनी सांगितले.

गोळीबारात विकास अहमद (वय १८) या तरुणाचा मृत्यू झाला. विकासचा गोळी लागून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे. तर जखमी झालेल्या महिलेला पायात गोळी लागली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.