सीमा रेषेवर पाकिस्तानची आगळीक सुरुच असून जम्मू- काश्मीरमधील सुंदरबनी सेक्टर येथे पाकने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. यात भारतीय सैन्याचा एक जवान शहीद झाला आहे.

गुरुवारी सकाळी सीमा रेषेवर सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. या गोळीबारात भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला आहे. यश पौल (वय २४) असे या शहीद जवानाचे नाव आहे.  सीमा रेषेवर पाकची आगळीक सुरु असतानाच दुसरीकडे जम्मू- काश्मीरमधील सोपोर येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या पथकावर ग्रेनेड हल्ला केला. यात तीन जवान जखमी झाले आहेत.

चार दिवसांपूर्वीही पाकिस्तानी सैन्याने सीमा रेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. यात भारताचा एक जवान शहीद झाला तर तीन जवान  जखमी झाले होते. रायफलमन कमरजित सिंग असे या शहीद जवानाचे नाव होते.

गेल्या महिन्यात पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील बालाकोट येथील दहशतवाद्यांच्या तळांवर एअर स्ट्राइक केले होते. भारताच्या या कारवाईनंतर पाकच्या सीमा रेषेवरील कुरापती वाढल्या आहेत. बालाकोटच्या दहशतवादी तळांवर जी कारवाई भारतीय वायुदलाने केली होती त्यानंतर अशा घटना वाढल्या आहेत. रविवारीही पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले होते तसेच काही प्रमाणात गोळीबारही करण्यात आला होता.