जवानाकडून तरुणीच्या विनयभंगाचा प्रयत्न; लष्कराच्या गोळीबारात तीन जण ठार

काश्मीरच्या उत्तरेकडील कुपवाडा जिल्ह्य़ातील हंडवारा शहरात लष्करातील एका जवानाने एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला त्याविरुद्ध स्थानिकांनी निदर्शने केली असता त्यांच्यावर लष्कराने केलेल्या गोळीबारात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे या भागांत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.

शहरातील एक स्वच्छतागृहाजवळ लष्करातील एका जवानाने एका युवतीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक संतप्त झाले आणि त्यांनी निदर्शने करण्यास सुरुवात केली. या घटनेची खबर शहरभर पसरताच संतप्त नागरिकांनी निदर्शने करून संबंधित जवानाच्या अटकेची मागणी केली. तेव्हा लष्कारने केलेल्या गोळीबारात चार युवक जखमी झाले. जखमींपैकी एका युवकाच्या वर्मी गोळी लागल्याने तो जागीच ठार झाला तर दुसरा हॉस्पिटलमध्ये मरण पावला. दरम्यान, सदर युवतीनेच लष्कारीत जवानाशी गैरवर्तन केल्याचा आरोपही आता करण्यात येत आहे.

दरम्यान, हंडवार जिल्ह्य़ातील घटनेचे तीव्र पडसाद श्रीनगर आणि पुलवामा जिल्ह्य़ांत उमटले. संतप्त जमावाने काही ठिकाणी दगडफेक केली. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी संवेदनक्षम ठिकाणी अतिरिक्त पोलीस कुमक तैनात करण्यात आली आहे. नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने या घटनेच्या चौकशीची मागणी केली असून हुरियतचे नेते गिलानी यांनी बुधवारी बंदची हाक दिली आहे.

लष्कराचे चौकशीचे आदेश

लष्कराच्या गोळीबारात तीन जण ठार होण्याच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.चौकशी पूर्ण झाल्यानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे लेफ्ट. जन. डी. एस. हुडा यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना सांगितले. राज्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नसील असताना अशा प्रकारच्या घटनांमुळे शांतता प्रक्रियेत बाधा निर्माण होते, असे मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटले आहे.