सुट्टीवर आलेले बीएसएफ जवान रमीझ पारे यांची दहशतवाद्यांनी घरात घुसून हत्या केली. जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यातील हाजिन येथे काल रात्री उशिरा ही घटना घडली. पारे यांच्या घरातील तीन जण या हल्ल्यात जखमी झाले आहेत. तीन ते चार दहशतवाद्यांनी पारे यांच्या घरावर अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर पारे यांना घरातून फरफटत बाहेर आणले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडून हत्या केली, अशी माहिती पोलीस महासंचालक एस. पी. वेद यांनी दिली.

दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बीएसएफ जवान पारे (वय ३३) यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबातील तिघे जण जखमी झाले आहेत. त्यांना श्रीनगर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पारे हे बीएसएफच्या ७३ बटालियनमध्ये सेवेत होते. ते आपल्या घरी सुट्टीवर आले होते. त्याचवेळी दहशतवाद्यांनी त्यांची क्रूरपणे हत्या केली, असे बीएसएफकडून सांगण्यात आले. लष्कर आणि निमलष्करी दलात सेवा बजावणाऱ्या काश्मीरमधील विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांची संख्या मोठी आहे. खोऱ्यातील दहशतवाद्यांकडून त्यांना याआधी लक्ष्य करण्यात येत नव्हते, पण आता संपूर्ण चित्रच बदलले आहे, असे सांगण्यात येत आहे. यावर्षी मे मध्ये लेफ्टनंट उमर फयाझ या लष्करी अधिकाऱ्याचेही अपहरण करून हत्या करण्यात आली होती. तेही सुट्टीवर आले होते. श्रीनगर येथील मशिदीच्या परिसरात जूनमध्येही जम्मू-काश्मीर पोलीस दलातील उपअधीक्षक मोहम्मद आयुब पंडित यांची जमावाने हत्या केली होती.