सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून जम्मू- काश्मीरमधील सुंदरबनी आणि पूंछ येथे पाकिस्तानी सैन्याने बुधवारी पहाटे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गेल्या २४ तासांमध्ये पाकिस्तानने तीन वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. भारतानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्यातील सूत्रांनी सांगितले.

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या १२ दिवसांनंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर सर्जिकल स्ट्राइक केले. यानंतर पाकिस्तानच्या विमानांनीदेखील भारताच्या हद्दीत घुसखोरी केली होती. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवरील तणाव वाढला आहे. सीमारेषेवर पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्याचे प्रमाण देखील वाढले आहे. मंगळवारी रात्री अकरा ते बुधवारी पहाटे साडे चार वाजेपर्यंत राजौरीतील सुंदरबनी सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. गेल्या २४ तासांमध्ये पाकने तिसऱ्यांदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे.

दरम्यान, सोमवारी पहाटे देखील तीनच्या सुमारास पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. तसेच मोर्टार डागण्यात आले होते.

दुसरीकडे काही दिवसांपूर्वी सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पूँछ आणि राजौरी जिल्ह्यातील नागरिकांसाठी ४०० अतिरिक्त बंकर बांधण्यास मंजुरी देण्यात आली आहे. एका महिन्यात दोन्ही जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी दोनशे बंकर बाधण्यात येणार आहेत. सीमेपलीकडून गोळीबार, तोफांचा मारा झाल्यानंतर नागरिकांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेता यावा यासाठी हे अतिरिक्त बंकर बांधण्यात येणार आहेत.