News Flash

जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती सईद यांचे निधन

मुफ्ती यांनी १ मार्च २०१५ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.

जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांचे गुरूवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. श्वास घेण्याचा त्रास होऊ लागल्याने २४ डिसेंबर रोजी सईद यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावत गेली आणि आज सकाळी आठ वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्यावर्षी काश्मीरमध्ये भाजप आणि पीडीपी यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर मुफ्ती सईद यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली होती. राष्ट्रपती प्रणब मुखर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
गेल्या वर्षी झालेल्या जम्मू काश्मीर विधानसभेत मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीपल्स डेमोक्रॉटीक पार्टीने (पीडीपी) सर्वाधिक २८ जागा जिंकल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकावरील भाजपने २५ जागांवर विजय मिळवला होता. त्यामुळे या दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन इथे सरकार स्थापन केलं. वेगवेगळ्या भूमिका असलेले दोन पक्ष चक्क एकत्र आल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या. मुफ्ती यांनी १ मार्च २०१५ रोजी जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, आता त्यांची कन्या मेहबुबा मुफ्ती यांच्याकडे जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदाची सूत्रे जाण्याची शक्यता आहे.
मुफ्ती मोहम्मद सईद यांनी देशाचा पहिला मुस्लिम गृहमंत्री होण्याचा मान मिळवला होता. १९८९ ते ९० या काळात व्ही पी सिंग सरकारमध्ये ते केंद्रीय गृहमंत्री होते. मात्र त्यांची गृहमंत्रीपदाची कारकीर्द वेगळ्याच कारणामुळे लक्षात राहिली . गृहमंत्री असताना त्यांची तिसरी कन्या रूबैयाचे अतिरेक्यांकडून अपहरण करण्यात आले होते. तिची सुटका करण्याच्या मोबदल्यात सरकारवर ५ अतिरेक्यांना सोडण्याची नामुष्की ओढविली होती.

मुफ्ती मोहम्मद सईद यांची राजकीय कारकीर्द
* १९५० मध्ये नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून राजकारणात प्रवेश.
* १९७२ मध्ये काँग्रेसचे राज्यमंत्री.
* १९८७ मध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी
* १९८९ ते १९९० या काळात केंद्रीय गृहमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला
* २००२ मध्ये पहिल्यांदा जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान
* १ मार्च २०१५ रोजी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन करत दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी विराजमान

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 7, 2016 8:47 am

Web Title: jammu and kashmir chief minister mufti mohammad sayeed passed away
टॅग : Bjp,Mehbooba Mufti,Pdp
Next Stories
1 ‘अतुल्य भारत’ मोहिमेतून आमिर खानची गच्छंती!
2 दुसऱ्यांदा भाजप अध्यक्षपदासाठी अमित शहा यांची पूर्वतयारी
3 अरविंद केजरीवाल व गृहसचिवांमध्ये पुन्हा शीतयुद्ध
Just Now!
X