जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्य़ात तपासणी नाक्यावर सुरक्षा रक्षकांना टाळून भरधाव वेगाने पुढे जाणाऱ्या वाहनावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) अधिकाऱ्यांनी केलेल्या गोळीबारात  चालक ठार झाल्याची घटना बुधवारी घडली, असे पोलिसांनी सांगितले.

बडगाम जिल्ह्य़ातील कवुसा येथील तपासणी नाक्यावर सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी एका गाडीला थांबण्याचा इशारा केला, मात्र त्याकडे दुर्लक्ष करून चालकाने भरधाव वेगाने गाडी पुढे नेली, त्यामुळे सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये वाहनचालक जखमी झाला.

या वाहनचालकाचे नाव मेहराजुद्दीन असे असून तो मखाना बीरवाहचा रहिवासी आहे, जखमी अवस्थेत त्याला एसएमएचएस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तेथे तो मरण पावला, असे पोलिसांनी सांगितले. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

चौकशीची मागणी

सीआरपीएफच्या गोळीबारात एक वाहनचालक ठार झाल्याच्या प्रकरणाची नि:पक्षपाती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जम्मू-काश्मीर प्रदेश काँग्रेस समिती आणि पीडीपीने एका निवेदनाद्वारे केली आहे. त्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.