जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंवरील दहशतवादी हल्ला ताजा असतानाच मंगळवारी संध्याकाळी बडगाम येथे दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक सुरु झाली आहे. बडगाममध्ये दोन ते तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर येत आहे.

बडगाममध्ये दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानंतर सुरक्षा दलांनी मंगळवारी संध्याकाळी परिसरात शोधमोहीम सुरु केली. सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना घेरले असून दोन ते तीन दहशतवादी लपून बसले असावे असा अंदाज आहे. परिसरात पोलिसांचा बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. सोमवारी अनंतनागमध्ये दहशतवाद्यांनी अमरनाथ यात्रेवरुन परतणाऱ्या यात्रेकरूंच्या बसवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला होऊन २४ तासांचा कालावधी लोटला असतानाच पुन्हा एकदा चकमक सुरु झाली आहे.