जम्मू- काश्मीरमधील हंदवाडा येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. अजूनही चकमक सुरु असल्याचे समजते.

हंदवाडा येथे ‘लष्कर- ए- तोयबा’ या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. रविवारी पहाटे सैन्याच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरले. यानंतर झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला. परिसरात अजूनही चकमक सुरु असल्याचे स्थानिक प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे.

दुसरीकडे शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी त्राल येथे पीडीपीचे आमदार मुश्ताक अहमद शाह यांचे निकटवर्तीय मोहम्मद अश्रफ पीर यांच्या घरावर हल्ला केला. या हल्ल्यात जीवितहानी झाली नाही. मात्र पीर यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापूर्वी बुधवारी दहशतवाद्यांनी पुलवामा जिल्ह्यात एका विशेष पोलिस अधिकाऱ्याची राहत्या घरी गोळ्या घालून हत्या केली होती. दहशतवाद्यांविरोधात सैन्यानेही मोहीम सुरु केली असून गेल्या वर्षभरात सुमारे १६० दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.