जम्मू- काश्मीरमधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावरील दहशतवादी हल्ल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत चार जवान शहीद झाले असून यात मेजर पदावरील अधिकाऱ्याचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुलवामा येथील पिंगलान येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. यानुसार सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम राबवली. या शोधमोहीमेदरम्यान दबा धरुन बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला. या गोळीबारात पाच जवान जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील चार जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर एक जवान यात जखमी झाला आहे. शहीद झालेल्या चार जवानांमध्ये मेजर दर्जाच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे.  सुरक्षा दलांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरले असून अजूनही चकमक सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे दहशतवादी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ज्या दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे त्यांचा पुलवामा येथील घटनेशी काही संबंध आहे का याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. या चकमकीत एक नागरिकही जखमी झाल्याचे समजते.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jammu and kashmir encounter terrorists security forces pinglan pulwama soldiers major martyred
First published on: 18-02-2019 at 07:53 IST