जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी सकाळी मुसळधार पाऊस झाल्याने महापुरात अडकलेल्यांना वाचविण्यासाठी लष्कर आणि ‘राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दला’ने (एनडीआरएफ) सुरू केलेल्या मदतकार्यामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. महापुराचा हा १३ वा दिवस असून अजूनही लाखभर लोक नागरिक महापुरात अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तसेच त्यांना सुटकेसाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
रविवारी सकाळी मुसळधार पाऊस पडल्यामुळे हेलिकॉप्टर आणि बोटीद्वारे अडकलेल्या नागरिकांना वाचविण्यात अडथळे येत होते. ढगाळ वातावरण आणि दाट धुके यामुळे हवाई दलाच्या काही विमानांना मदतकार्य थांबवावे लागले, ११ वाजल्यानंतर पुन्हा मदतकार्यास सुरुवात करण्यात आली. गेल्या १०० वर्षांमधील या सर्वात भीषण जलप्रलयात किमान २५० जण दगावल्याची भीती व्यक्त होत आहे.
पावसामुळे मदत छावण्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले. ‘‘काश्मीर खोऱ्यात रविवारी झालेला पाऊस हा मुसळधार स्वरूपाचा नव्हता. त्याबाबत आम्हाला कोणताही इशारा आला नव्हता. रविवारी जोरदार पाऊस पडण्याची शक्यताही नव्हती,’’ असे हवामान खात्याचे संचालक बी. पी. यादव यांनी सांगितले.
दुप्पट शिधावाटप करा – ओमर
महापुरामुळे काश्मीर खोऱ्यातील जनता जीवनावश्यक सुविधांपासून दूर जात आहे. त्यामुळे त्यांना राज्याच्या अन्नपुरवठा आणि सार्वजनिक वितरण विभागाने दुपटीने शिधावापट करावे, असे आदेश मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिले.
दरम्यान, गेल्या दोन आठवडय़ांपासून श्रीनगर महापालिका प्रशासन जनतेची कामे करत नसल्याचे चित्र आहे. अनेक दिवसांपासून शहरातील कचरा उचलला न गेल्याने नागरिकांना स्वत:च कचरा जाळून त्याची विल्हेवाट करावी लागत आहे.