जम्मूमधील किश्तवार जिल्ह्यातील उसळलेल्या हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश जम्मू-काश्मीर सरकारने दिले आहेत. उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती या हिंसाचाराची चौकशी करतील आणि ठरावीक मुदतीत ते आपला अहवाल राज्य सरकारला देतील, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले.
जम्मूतील आणखी तीन तणावग्रस्त जिल्ह्य़ांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली असून लष्कराने रविवारी ध्वजसंचलनही केले. हिंसाचारग्रस्त किश्तवार जिल्ह्य़ात जम्मू-काश्मीर सरकारने राजकारण्यांना येण्यास बंदी घातल्यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांना रविवारी विमानतळावरच स्थानबद्ध करून नंतर माघारी पाठविण्यात आले.
किश्तवार जिल्ह्य़ात आणखी एकाचा मृतदेह आढळल्यानंतर शुक्रवारपासून सुरू असलेला जातीय तणाव सलग तिसऱ्या दिवशी कायम असल्याचे स्पष्ट झाले. शुक्रवारच्या हिंसाचारात दोन जण ठार आणि अनेक जण जखमी झाले होते. शनिवारी रात्री लुटालूट आणि हिंसाचाराच्या घटना घडल्यामुळे जम्मू आणि राजौरी जिल्ह्य़ांत संचारबंदी लागू करून काही भागांत लष्करासही पाचारण करण्यात आले. ही संचारबंदी रविवारी उधमपूर, संबा आणि कथुआ जिल्ह्यांतही लागू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.