जम्मू काश्मीरमधील माछिल सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणाऱ्या तीन दहशतवाद्यांचा सैन्याने खात्मा केला. दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला असून गेल्या १५ दिवसांत सीमा रेषेवर तिसऱ्यांदा घुसखोरीचा डाव उधळून लावण्यात आला आहे.

माछिल सेक्टरमध्ये मंगळवारी रात्री उशीरा सीमा रेषेवर तीन दहशतवादी घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या गस्ती पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी दहशतवाद्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता घनदाट जंगलाचा फायदा घेत दहशतवाद्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. यानंतर दहशतवादी आणि सैन्यामध्ये चकमक झाली आणि या चकमकीत तिन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. दहशतवाद्यांकडून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात शोधमोहीम सुरु असल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

गेल्या १५ दिवसांमधील घुसखोरीचा तिसरा प्रयत्न उधळून लावण्यात आला आहे. यापूर्वी २६ मेरोजी पाकिस्तानच्या ‘बॅट’ तुकडीतील दोन जणांचा खात्मा करण्यात आला होता. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीच्या घटना वाढत असून तापमानातील बदलामुळे घुसखोरीच्या घटना आणखी वाढतील असा इशारा यापूर्वीच देण्यात आला होता. यानंतर सैन्याने सीमा रेषेवर करडी नजर ठेवली आहे.