सीमा रेषेवर पाकिस्तानच्या कुरापती सुरुच असून शुक्रवारी नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचा एक जवान शहीद झाला आहे. नाईक बख्तवार सिंग (वय ३४) असे शहीद झालेल्या जवानाचे नाव असून ते मूळचे पंजाबमधील रहिवासी होते.

शुक्रारी पहाटे नौशेरा सेक्टर येथे पाकिस्तानी सैन्याने भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिले. पाकच्या गोळीबारात नाईक बख्तवार सिंग हे जखमी झाले होते. रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. सिंग हे पंजाबचे रहिवासी असून त्यांच्या पश्चात पत्नी जसबीर कौर, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा ११ वर्षाचा, मुलगी ९ वर्षाची तर सर्वात लहान मुलगा १० महिन्यांचा आहे.

राजौरी जिल्ह्यात सिंग यांच्या पार्थिवाला श्रद्धांजली अर्पण केली जाईल. यानंतर त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी पंजाबबमधील मूळगावी पाठवण्यात येईल. दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग येथे शुक्रवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलाच्या चकमकीतही एक जवान शहीद झाला होता. या चकमकीत सहा जण जखमी झाले होते. सिंग हे धाडसी आणि प्रामाणिक जवान होते. त्यांना सैन्याकडून आदरांजली अशी प्रतिक्रिया सैन्याच्या प्रवक्त्यांनी दिली.