जम्मू- काश्मीरमधील तंगधार सेक्टरमध्ये सैन्याच्या सतर्क जवानांनी घुसखोरीचा डाव उधळून लावला. सैन्याच्या कारवाईत पाच घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आले असून परिसरात सैन्याकडून शोधममोहीम राबवली जात आहे.

शनिवारी पहाटे तंगधार सेक्टरमध्ये काही दहशतवादी भारतात घुसखोरी करत असल्याचे सैन्याच्या निदर्शनास आले. यानंतर झालेल्या चकमकीत सैन्याने पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दहशतवादी कोणत्या संघटनेशी संबंधित होते, याबाबत कोणतीही माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

रमजानच्या पवित्र महिन्यात जम्मू- काश्मीरमध्ये सैन्याने शस्त्रसंधी लागू केली आहे. मात्र दुसरीकडे सीमेवर पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. गेल्या आठवडाभरात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात सीमेवरील गावात राहणाऱ्या ५ नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर २० हून अधिक जण जखमी झाले. शस्त्रसंधीच्या उल्लंघनामुळे सीमारेषेजवळील गावात राहणाऱ्या हजारो ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी न्यावे लागले होते.