जम्मू- काश्मीरमधील श्रीनगर येथे शुक्रवारी पोलिसांवर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी आयसिस या दहशतवादी संघटनेने स्वीकारली असली तरी जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी हा दावा फेटाळून लावला. जम्मू-काश्मीरमध्ये आयसिस हल्ला करण्याची शक्यता कमी असून गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनीही या दाव्यावर शंका उपस्थित केली आहे.

शुक्रवारी श्रीनगरमध्ये पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता. शनिवारी आयसिसने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आणि देशभरात खळबळ उडाली. आयसिसने भारतातील हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याची ही पहिलीच वेळ असल्याने सुरक्षा यंत्रणा कामाला लागल्या. जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस पी वैद यांनी पत्रकार परिषदेत यावर भाष्य केले. श्रीनगरमधील हल्ल्यामागे आयसिसचा हात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी मुगीस अहमद मीर या दहशतवाद्याने झाकुरा येथे पोलिसांवर हल्ला केला होता. त्याने काळ्या रंगाचा शर्ट घातला होता. या चकमकीत पोलीस दलातील एक जवान जखमी झाला होता.

दहशतवाद्याच्या मृतदेहावर काळ्या रंगाचा कपडा टाकण्यात आला होता. काळ्या रंगाच्या झेंड्याचा वापर प्रामुख्याने आयसिसकडून केला जातो. मात्र यापूर्वी अल कायदा सारख्या दहशतवादी संघटनेनेही काळ्या रंगाच्या कपड्याचा वापर केला होता, याकडेही अनेकांनी लक्ष वेधले.
काश्मीरमधील पोलीस महानिरीक्षक मुनीर अहमद खान म्हणाले, आम्ही या प्रकरणाचा तपास करत आहोत. मीर हा तेहरिक- अल- मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा जिल्हा कमांडर होता असा दावा केला जातो. तर दुसरीकडे आयसिसनेही मीर हा त्यांच्या संघटनेत होता असा दावा केला, याकडे त्यांनी लक्ष वेधले. याशिवाय अल कायदाचा जम्मू- काश्मीरमधील प्रमुख झाकीर मुसानेही या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

गुप्तचर यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनीही आयसिसच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. लास वेगासमधील हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली, मात्र अमेरिकेतील तपास यंत्रणांनी हा दहशतवादी हल्ला नव्हता असे सांगितले होते. त्यामुळे श्रीनगरमधील हल्ल्याबाबत आयसिसचा दावा कितपत खरा असेल याबाबत शंका आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र जम्मू-काश्मीरमधील तरुणांचे ब्रॅन वॉश करण्याचे काम आयसिससारखी संघटना करु शकते, पाकिस्तानमध्ये आयसिस सक्रीय झाल्यास भारतासाठी धोक्याची घंटा ठरेल, असे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.