क्रूरकृत्यांनी जगभरात दहशत निर्माण करणारी आयसिस ही संघटना आता जम्मू- काश्मीरमध्येही सक्रीय झाल्याची शक्यता आहे. आयसिसने रविवारी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. आययसिने काश्मीरमधील हल्ल्याची जबाबदार स्वीकारल्याची तीन महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

रविवारी श्रीनगरमध्ये हुर्रियत नेते फाझल हक कुरेशी यांच्या घराजवळ पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कॉन्स्टेबल फारुख अहमद शहीद झाले होते. हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पळ काढला होता. या हल्ल्याची जबाबदारी आयसिसने स्वीकारली आहे. आयसिसच्या अल- अमाक न्यूज एजन्सीने पत्रक काढून या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली.

पोलिसांनी इसा फाझिली याचा या हल्ल्यात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला आहे. इसाचे आयसिसशी संबंध असू शकतात, अशी शक्यता पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.  टेलिग्राम या अॅपवरही आयसिसने एक ग्रुप तयार केल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली असून या ग्रुपवरही हल्ल्याबाबतची माहिती देण्यात आली.

इसा फाझिली हा गेल्या वर्षींपर्यंत इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता. राजौरीतील बाबा गुलाम शाह बादशाह या विद्यापीठात तो शिकत होता. फाझिली सुरुवातीला झाकीर मुसाच्या दहशतवादी संघटनेत सामील झाला. मात्र, काही दिवसांनी त्याने मुसाच्या संघटनेतून बाहेर पडत आयसिसमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती सूत्रांनी दिली. रविवारी झालेल्या हल्ल्यामागे आयसिसचा हात होता का याला पोलिसांनी अद्याप दुजोरा दिलेला नाही.