भारताकडून जोरदार हरकत

संयुक्त राष्ट्रे : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत (यूएनएससी) पाकिस्तानने काश्मीरचा संदर्भ दिला त्याला भारताने जोरदार हरकत घेतली असून जम्मू-काश्मीर हा भारताचा अंतर्गत भाग असल्याचे स्पष्ट केले आहे.

पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रांमधील नवनियुक्त राजदूत मुनीर अक्रम यांनी सुरक्षा परिषदेत प्रथमच बोलताना काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. जम्मू-काश्मीरमधील स्थितीबाबत सुरक्षा परिषदेने कारवाई केली नाही त्याबद्दल पाकिस्ताला चिंता वाटत असल्याचे मुनीर अक्रम म्हणाले.

अक्रम यांनी केलेल्या आगळिकीला भारताचे राजनैतिक अधिकारी के. नागराज नायडू यांनी तीव्र हरकत घेतली. पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत भागाबाबत दिलेला संदर्भ अनावश्यक आहे. जम्मू-काश्मीर भारताचा अंतर्गत भाग आहे आणि त्यामध्ये संयुक्त राष्ट्रे किंवा अमेरिका यांच्यासह कोणत्याही त्रयस्थांची मध्यस्थी आम्हाला अमान्य आहे, हा द्विपक्षीय प्रश्न आहे, असे भारताने सातत्याने स्पष्ट केले आहे.