जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील हंडवाडा परिसरात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. आज पहाटे हंडवाडा येथील गुलूरा गावात दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक झाली, या चकमकीत सुरक्षा रक्षकांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. लष्कराकडून सध्या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडा जिल्ह्यातील गुलूरा गावात २ ते ३ दहशतवादी लपल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. त्यानंतर जवानांनी या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले आणि एका घरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आले. दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर त्यांच्याकडील दोन ‘एके-४७ रायफल’सह अन्य काही सामान लष्कराने जप्त केले.