जम्मू-पठाणकोट मार्गावरील सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाले. त्यानंतर या भागात सर्वत्र रेड अॅलर्ट जारी करण्यात आला. दिवसभर या ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात होते. डोळ्यात तेल घालून ते सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहेत. अजूनही लष्कराकडून येथे कारवाई सुरु आहे. दरम्यान, नागरिकांचे आपल्या सैन्यावर असलेले प्रेम पुन्हा एकदा आधोरेखीत झाले आहे. कारण, सकाळपासून या भागात तैनात असलेल्या जवानांसाठी स्थानिक नागरिकांनी जेवण आणि पाणी पुरवले. दरम्यान, कठीण परिस्थितीत आपल्याप्रती नागरिकांनी दाखवलेल्या काळजीबद्दल जवानही मनोमन सुखावले आहेत.


जम्मू-पठाणकोट मार्गावर असलेल्या सुंजवा लष्करी तळावर शनिवारी पहाटे दहशतवाद्यांनी हल्ला केला. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. पहाटे पाच वाजता लष्करी तळावर असलेल्या स्टाफ क्वार्टरवर दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. यात २ जवान शहीद झाले असून एका चिमुकलीसह चार जण जखमी झाले आहेत. जम्मू शहरात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. लष्कराने पूर्ण परिसराला वेढा घातला असून शोध मोहीमही सुरू आहे. दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचाही वापर करण्यात आला. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार केला गेला. ऑपरेशन लवकरात लवकर संपावे यासाठी उधमपूर आणि सरसवा येथून पॅरा कमांडर्संनाही पाचारण करण्यात आले आहे.

लष्कराचे अधिकारी एस. डी. सिंग जमवाल यांनी हा दहशतवादी हल्ला असल्याचे सांगितले. ते म्हणाले, पहाटे ४.५५ च्या सुमारास संशयास्पद हालचाल दिसून आली आणि अचानक एका बंकरवर दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले.