एमबीएनंतर काही काळ स्वत:चा व्यवसाय करणारा आणि नंतर दहशतवादी मार्गाकडे वळालेल्या तरुणाला चकमकीत कंठस्नान घालण्यात आले. इश्फाक अहमद वानी असे या तरुणाचे नाव असून तो पुलवामा जिल्ह्यातील रहिवासी होता. सहा महिन्यांपूर्वीच तो दहशतवादी मार्गाकडे वळला होता.

पुलवामा येथील अवंतीपोरामधील रिंझीपोरा येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. शुक्रवारी सकाळी सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झाली. या चकमकीत इश्फाक वानी या दहशतवाद्याचा मृत्यू झाला. तर दोन दहशतवादी तिथून पळ काढण्यात यशस्वी झाले.

स्थानिक वृत्तपत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार, इश्फाकचे वडील हे देखील दहशतवादी संघटनेत होते. ३१ ऑगस्ट १९९६ मध्ये त्याच्या वडिलांचा चकमकीत मृत्यू झाला होता. इश्फाक हा उच्चशिक्षित होता. त्याने एमबीएदेखील पूर्ण केले. शिक्षणानंतर त्याने फळांचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, सहा महिन्यांपूर्वी इश्फाक व्यवसाय सोडून दहशतवादी संघटनेत सामील झाला.