नवी दिल्ली : पूर्वाश्रमीच्या जम्मू-काश्मीर राज्याच्या ४ माजी मुख्यमंत्र्यांसह सध्याच्या या केंद्रशासित प्रदेशातील १४ नेत्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली २४ जूनला नवी दिल्लीत होणाऱ्या बैठकीत आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी शनिवारी दिली.

जम्मू-काश्मीरमधील पुढील कार्यवाहीबाबत विचारविनिमय करण्यासाठी पंतप्रधानांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीसाठी या नेत्यांना आमंत्रित करण्यासाठी केंद्रीय गृहसचिव अजय भल्ला यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. आमंत्रित करण्यात आलेल्यांमध्ये फारुक अब्दुल्ला व त्यांचे पुत्र ओमर अब्दुल्ला (नॅशनल कॉन्फरन्स), काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद व पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती या ४ माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. काँग्रेसचे नेते तारा चंद, पीपल्स कॉन्फरन्सचे मुझफ्फर हुसेन बेग, तसेच भाजपचे नेते निर्मल सिंह व कविंदर गुप्ता या ४ माजी उपमुख्यमंत्र्यांनाही बैठकीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

याशिवाय, माकपचे नेते मोहम्मद युसूफ तारिगामी, जम्मू व काश्मीर अपना पार्टीचे प्रमुख अल्ताफ बुखारी, पीपल्स कॉन्फरन्सचे सज्जाद लोन, जे-के काँग्रेसचे प्रमुख जी.ए. मीर, भाजपचे रविंदर रैना आणि पँथर्स पार्टीचे नेते भीम सिंह यांचाही आमंत्रितांमध्ये समावेश आहे.

केंद्र सरकारने ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू- काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करून त्याचे केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करण्याची घोषणा केल्यानंतर प्रथमच होऊ घातलेल्या या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह इतर केंद्रीय नेते उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.