झारखंडमध्ये बदली झाल्याने नाराज असलेला सैन्यातील जवान हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इद्रीस मीर असे या जवानाचे नाव असून गेल्या आठवड्यापासून तो बेपत्ता होता.

सैन्यात शिपाई पदावर कार्यरत असलेला इद्रीस मीर याची झारखंडमध्ये बदली झाली होती. यामुळे तो नाराज होता. १२ एप्रिलरोजी इद्रीस शोपियाँ जिल्ह्यातील साफनगर या मूळगावी पोहोचला. शनिवारी रात्री पासून तो घरातून बेपत्ता झाला होता. सोमवारी सकाळी त्याचे वडील मोहम्मद सुलतान मीर यांनी पोलिसांकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. इद्रीस मीर हा सैन्यात भरती झाला त्यावेळी तो बीएससीच्या द्वितीय वर्षात शिकत होता.

रविवारी जम्मू- काश्मीरमधील सोशल मीडियावर इद्रीस मीरचे हातात एके ४७ घेतलेले छायाचित्र व्हायरल झाले. यावरुन तो दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे समोर आले आहे. रविवारी इद्रीस आणि आणखी दोन तरुण हिज्बुल मुजाहिद्दीनमध्ये सामील झाल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळाल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. बदलीमुळे तो नाराज होता अशी माहिती समोर येत आहे. मात्र, तो दहशतवाद्यांच्या संपर्कात कसा आला याचा तपास सुरु आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे. तर सैन्याने या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याचे स्पष्ट केले.