जम्मू महापालिकेत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. तसेच काश्मीर खोऱ्यात १०० प्रभागांमध्ये विजय मिळवत अस्तित्व दाखवून दिले आहे. चार टप्प्यांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर पीडीपी व नॅशनल कॉन्फरन्सने बहिष्कार टाकला होता. त्यामुळे अनेक ठिकाणी अपक्षांची सरशी झाली आहे.  प्रतिष्ठेच्या श्रीनगर महापालिकेत अपक्षांनी सर्वाधिक ७४ पैकी ५३ जागाजिंकल्या आहेत. तेथे काँग्रेसला १६ व भाजपला ४ जागा मिळाल्या आहेत.

काश्मीर विभागात ४२ नगरपालिकांमध्ये सर्वाधिक १७८ प्रभाग अपक्षांनी जिंकले आहेत. त्या पाठोपाठ काँग्रेसला १५७ व भाजपला १०० प्रभागांमध्ये विजय मिळवता आला. १२ नगरपालिकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे त्यात पाच ठिकाणी त्यांना बहुमत आहे.  तर काँग्रेस १५ ठिकाणी मोठा पक्ष असून, ११ ठिकाणी त्यांना बहुमत आहे. जम्मूत काँग्रेसचा पराभव झाला आहे. जम्मू विभागातील ३६ नगरपालिकांमधील ४४६ प्रभागांपैकी भाजपला १५ ठिकाणी सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तर अपक्षांना १२ पालिकांमध्ये व काँग्रेसला पाच नगरपालिकाजिंकता आल्या आहेत. या विभागात भाजपने १६९ तर अपक्षांना १६७ प्रभागांत विजय मिळाला, तर काँग्रेसला ९६ जागाजिंकता आल्या आहेत. नॅशनल कॉन्फरन्स व पीडीपीच्या निवडणुकीवरील बहिष्काराने अपक्षांची संख्या वाढली आहे. जम्मू व काश्मीरमधील ५२ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शनिवारी मतमोजणी झाली.

लडाखमध्ये भाजपला धक्का

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत लडाखमध्ये भाजपने विजय मिळवला होता. मात्र पालिका निवडणुकीत लेह व कारगिलमध्ये काँग्रेसने भाजपला पराभूत केले. या दोन ठिकाणी भाजपला खातेही उघडता आले नाही.